नाशिक : होळी हा सण संपूर्ण देशभरात धूमधडाक्यात साजरा ( Holi Festival ) केला जातो. प्रत्येक गावानुसार वेगवेगळ्या परंपरा असतात. पण, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव ( b ) तालुक्यातील काही गावांमध्ये होळीचा सण साजरा करण्याची परंपरा अनोखी आहे. ही होळीची परंपरा आणि उत्सव पाहण्यासाठी गावात मोठी गर्दी होत असते. बंजारा ( Banjara ) गीतांवर डफाच्या साथीने चौफेर ठेका धरून नृत्य सादर करत समाजातील पुरुषांना यथेच्छ लाकडी दंडुक्यांनी हाताखालून काढत एक आगळ्या – वेगळ्या पद्धतीची होळी साजरी केली जाते. बंजारा समाजाचा ‘ तांडा ‘ असलेली न्यायडोंगरी, कसाबखेडा, कासारी, पोही, मुळडोंगरी, लोहशिंगवे आदी भागात अशा पद्धतीची होळी साजरी केली जाते.
बंजारा समाजातील नात्याने दिर – भावजयी यांचा या होळी सण साजरा करतांनाच उत्साह काही न्याराच असतो. चेष्टेचं नातं असलेल्या समाजातील पुरुषांना लाकडी दंडुक्यान मार खात ठोकलेला खुंटा उपसवण्याचं तगड आव्हान या महिलांनी ( गेरनी ) दिलेलं असतं.
हे आव्हान पेलवतांना मोठी धांदळ यातील पुरुष वर्गाची होत असते. एकूणच होळी सण साजरा करताना ‘ धुंड ‘ या खेळात आपल्या संस्कृती जतन आम्ही करत असल्याचे स्थानिक सांगतात. डोंगर दऱ्यात भटकंती करून लोकसंस्कृतीच जतन करत ‘ बंजारा समाजाकडून होळी साजरी केली जाते.
इतर ठिकाणी होळी पेटल्यांतर बंजारा समाजात दुसऱ्या दिवसानंतर होळी सण साजरा केला जातो. दांडी पौर्णिमेपासून त्याची तयारी तशी सुरु असते. आपल्या तांड्यावरील मुखिया असलेल्या नायकाची परवानगी घेऊन होळी सणाला सुरवात केली जाते.
तांड्यावरील सर्व बंजारा समाज बांधव नायकाच्या घरी जावून होळी खेळण्याची परवानगी मागतात आणि त्यासाठी मान म्हणून दोन रुपये दंडही आकारला जातो. परवानगी मिळाल्यानंतर होळीची मोठी धूम या समाजात साजरी होते.
ज्यांच्या घरात नव्याने मुलगा जन्माला आला आहे.त्यांच्या घरासमोर होळी निमित्ताने धुंड हा खेळ खेळला जातो. बाळाला खाली बसवून त्यावर ठोळी धरून बंजारा गीते गायली जातात. बाळाचे नामकरण झाल्यानंतर खुंटा उपटणे या खेळाला सुरुवात होते.
खेळ सुरू झाल्यानंतर दोन खुंटे जमिनीत गाडले जातात. हे खुंटे उपटण्याचे काम समाजातील पुरुष वर्गाकडे जाते. जेव्हा जेव्हा हे पुरुष मंडळी खुंटा उपटण्यासाठी पुढे येतात तेव्हा महिला वर्ग आपल्या हातातील काठ्यांनी पुरुषांना यथेच्छ चोप देतात आणि खुंटा उपटण्यास विरोध करतात.
पुरुषही हा विरोध झुगारून लाकडी दंडुक्याने मार खात पुन्हा खुंटा उपटण्यासाठी प्रयत्न करत असतात. असा हा खेळ तासन तास सुरूच असतो. जेव्हा हे खुंटे उपटले जातात त्यानंतरच खेळाची सांगता होते.
या खेळापूर्वी ज्याच्याघरी धुंड असेल त्यांच्या घरी बंजारा समाजातील गाणे म्हणत रात्र काढली जाते आणि नंतर पहाटे होळी पेटवली जाते आणि तिला गाणे म्हणत फेरी मारली जाते. बंजारा समाजात लोकसंस्कृतीचे पैलू उलगडणारा सणांपैकी एक होळी या सणाला विशेष महत्व असते.