बुलढाणा : होळी सर्वत्र साजरी केली जात आहे. या होळीचा उत्साह सगळीकडे दिसून येतो. काल गावोगावी होळ्या पेटवल्या गेल्या. पण, एका गावात वेगळीच परंपरा आहे. ही परंपरा लोकं पाळतात. कारण लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात, असा त्यांचा समज आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील मादणी येथे माढेश्वरी देवी आहे. ही देवी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवीला नवस करणारे सर्वधर्मीय नागरिक आहेत. ज्यांची मनोकामना पूर्ण होते, असे भाविक देवीचे रुप धारण करत गाव प्रदक्षिणा घालतात. दैत्याचा वध करण्याचे सोंग घेतात. देवीच्या सोंगाची ही प्रथा दीडशे वर्षांपासून आजही अखंडपणे सुरु आहे. हे देवीचे सोंग सर्वधर्मियांच्या आस्थेचे प्रतीक आहे.
मादणी येथील ग्रामदैवत म्हणून संबोधली जाणारी माढेश्वरी मातेचे जागृत ठिकाण आहे. असे सांगितल्या जाते की माढेश्वरीचे सत्व हे लक्ष्मण देवकर यांच्या पूर्वजांनी आणून येथे प्राणप्रतिष्ठा केली होती. त्यामुळे लक्ष्मण देवकर हे मानकरी आहेत. होळीच्या रात्री पहिल्या सोंगाचा मान त्यांना जातो. त्यानंतर ज्यांनी नवस बोलले आणि त्यांचे पूर्ण झाले, ते भक्त नऊ दिवस निरंकार उपवास ठेवतात. होळीच्या दिवशी रात्री देवीचे रूप धारण करतात.
गाव प्रदिक्षणा घातली जाते. काळ्या कपड्यात ढाल, तलवार घेऊन असलेल्या दैत्याचा वध करत सोंग पूर्ण होतो. कधी सात तर कधी दहा सोंग होतात. मादणी गावासाठी होळीची रात्र ही रात्र नसून उत्सव असतो. जवळपास प्रत्येक घरी पाहुणे असतात. सोबतच माढेश्वरी देवीच्या भक्तांची रिघ लागलेली असते. सोंगाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी प्रत्येक घरातून देवीला नैवद्य दिला जातो.