नागपूर : विदर्भामध्ये (Vidarbha) तीन दिवसीय महालक्ष्मी महोत्सवाची मोठी धूम असते. मोठ्या श्रद्धेने आणि भक्ती भावाने (Bhaktibhava) महालक्ष्मीचं घरी आगमन होऊन त्यांचा पूजा पाठ करत विधिवत सेवा केली जाते. तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी आपल्या गावाला जातात. म्हणजे विसर्जन केलं जातं, अशी ही परंपरा असलेल्या महालक्ष्मी पूजेच्या या सणाचा आज महत्त्वाचा दुसरा दिवस असतो. आज महालक्ष्मींना 16 चटण्या 16 भाज्या आणि विविध प्रकारचे पंच पकवान्न यांचा नैवेद्य चढविला जातो. या संपूर्ण उत्सवाला मोठं महत्त्व असतं. नागपुरातील एक इंगळे परिवार असा आहे ज्या परिवारात गेल्या 111 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. या इंगळे (Ingle) परिवारात आता जवळपास 70 सदस्य आहेत जे एकत्र येऊन महालक्ष्मीची पूजा करतात. कोरोनामुळे दोन वर्ष साध्या पद्धतीने पूजा झाली. मात्र यावर्षी महालक्ष्मीचा उत्साह मोठा आहे. त्यामुळे या परिवारातील सगळ्या सदस्यांनी एकत्रित येत महालक्ष्मी मातेची पूजा अर्चना केली. या निमित्ताने संपूर्ण परिवार वेगवेगळे राहत असले तरी एकत्र येऊन या उत्सवात सहभागी होतात.
अकोला शहरातल्या छोटी उमरी परिसरामध्ये राहणाऱ्या विजय करुले परिवारात गेल्या 350 वर्षापासून महालक्ष्मीची स्थापना केली जाते. या महालक्ष्मी स्थापनेमध्ये मुखवटे हे 350 वर्षापूर्वीचे आहेत. आजही या मुखवट्यांची स्थापना केली जाते. पांढऱ्या मातीपासून तयार केलेले मुखवटे असल्याचं आठव्या पिढीतील आशिष करुले सांगतात. आमच्या पूर्वजांनी सुरू केलेली परंपरा आजही आम्ही कायम ठेवत आहोत. करुले परिवारामध्ये सातवी ते आठवी पिढी असल्याचे पुष्पा कुरले सांगतात. दरवर्षी महालक्ष्मी स्थापना केली जाते. गाई जेव्हा संध्याकाळी घरी येतात त्यावेळेस बरोबर आरती केली जाते.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील जोशी कुटुंबीयांकडे 17 पिढ्यांपासून महालक्ष्मी वास्तव्यास आहेत. वाड्यातील स्वयंभू गणेश मंदिर सर्वदूर प्रसिद्ध असताना जोशी वाड्यात स्थापन होणारे श्री महागौरी देखील दीडशे वर्षापेक्षा अधिक काळापासून असल्याचे जोशी कुटुंबीयांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे या महालक्ष्मीचे वैशिष्ट्य असे आहे की, महालक्ष्मीचे मुखवटे हे काळ्या रंगाचे आहे. अशा प्रकारचे महालक्ष्मीचे मुखवटे अतिशय दुर्मिळ आहेत. यांची पूजा थोडी कठीण असते, असे बोलले जाते. चार पिढ्यांपासून या देवीच्या मुखवट्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेले नाही, असे कुटुंबीयांनी सांगितले. या गौरीच्या दर्शनासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या संख्येने येत असतात.