मुंबई : हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला विशेष महत्त्व आहे. नरक चतुर्दशी दिवाळीच्या एक दिवस आधी आणि धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी येतो. नरक चतुर्दशीला काळी चतुर्दशी (Narak Chaturdashi 2023) असेही म्हणतात. भारतातील काही ठिकाणी नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी म्हणूनही ओळखले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात फक्त हा एकमेव दिवस आहे ज्या दिवशी मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते. एखादा आजार किंवा कोणत्याही अपघातामुळे होणारी मृत्यूची भीती दूर करण्यासाठी या दिवशी यमराजाची पूजा केली जाते. नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. या दिवशी उटणे लावून आंघोळ करतात. या दिवशी संध्याकाळी यम तर्पण आणि दिवे दान करण्याची परंपरा आहे. नरक चतुर्दशी साजरी करण्यामागे काही रंजक कथा आहेत. असे मानले जाते की या दिवशी दिवा लावल्याने यमराज प्रसन्न होतात आणि अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते.
नरक चतुर्दशी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या एक दिवस आधी येतो. हिंदू धर्मात नरक चतुर्दशीला खूप महत्त्व आहे. या ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून यमाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून यमराजाची पूजा करणारा नरकात जाण्यापासून वाचतो आणि स्वर्गप्राप्ती करतो अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच संध्याकाळी यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूचे भय राहत नाही.
असे म्हटले जाते की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हा त्यांनी शरीराला तेल आणि उटणे लावून आंघोळ केली. तेल आणि उटणं लावून आंघोळ करण्याची ही परंपरा त्या दिवसापासून सुरू झाली. असे केल्याने नरकापासून मुक्ती मिळून स्वर्ग आणि सौंदर्याचे वरदान मिळते, अशी धार्मिक धारणा आहे.
नरक चतुर्दशी सण नरकासुर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की एके काळी नरकासुर नावाचा राक्षस होता ज्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून देव, देवी आणि ऋषींसह सोळा हजार राजकन्यांना कैद केले होते. यानंतर, राक्षसांच्या अत्याचाराने त्रासलेल्या देवता आणि राजकन्यांनी भगवान श्रीकृष्णाची मदत मागितली, त्यानंतर श्रीकृष्णाने त्यांचा वध केला. हिंदू धर्माच्या धर्मग्रंथानुसार या दिवशी नरकासुरापासून मुक्ती मिळाल्याच्या आनंदाने संपूर्ण पृथ्वी प्रसन्न झाली होती आणि सर्व देवताही खूप आनंदी होते. या दिवशी नरकासुराच्या वधाच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो, याला छोटी दिवाळी असेही म्हणतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)