MNS : गणेशोत्सव होताच मनसे लागणार स्वच्छतेच्या कामाला, अमित ठाकरे करणार चौपाट्या स्वच्छ..!

| Updated on: Sep 09, 2022 | 4:53 PM

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई आणि कोकणातील हजारो सार्वजनिक मंडळ तसेच गणेशभक्त मोठ्या भक्तिभावाने समुद्रात गणेश मूर्तीचे विसर्जन करतात, मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांपैकी अनेक मूर्ती आणि मूर्तींचे अवशेष भरतीच्या लाटांसोबत समुद्र किनाऱ्यावर येऊन वाळूत रुततात. त्यामुळे आपल्या बाप्पाची अशी अवस्था होऊ नये म्हणून ही स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे.

 MNS : गणेशोत्सव होताच मनसे लागणार स्वच्छतेच्या कामाला, अमित ठाकरे करणार चौपाट्या स्वच्छ..!
Amit Thackeray
Follow us on

मुंबई : राज्यात (Ganesh Visarjan) गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. गेली दोन वर्ष या उत्सवावर कोरोनाचे सावट होते, त्यामुळे अगदी साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जात होता. यंदा मात्र सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे उद्या पहाटेपर्यंत विसर्जन मिरवणूका निघतील असा अंदाज आहे. एकीकडे गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असताना दुसरीकडे (MNS Party) मनसेच्या हटक्या उपक्रमाची जोरदार चर्चा सुरु आहे. विसर्जनानंतर मनसेकडून समुद्र किनारी (Cleanliness campaign) स्वच्छता मोहिम राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत अमित ठाकरे यांचा देखील सहभाग असणार आहे. या मोहिमेदरम्यान किनाऱ्यालगत जे गणेश मूर्तींचे अवशेष आढळून येतील ते महापालिकेकडे दिले जाणार आहे.

दोन तास स्वच्छतेसाठी

मुंबईतील गणेश विसर्जनाला सुरवात झाली आहे. यंदाचे उपक्रम आणि भक्तांची गर्दी काही औरच आहे. ज्या तुलनेत गर्दी त्याच पद्धतीने आता समुद्र किनारी घाणीचे साम्राज्य राहणार, शिवाय अनेक गणेश मूर्त्यांचे अवशेष हे चौपाट्यावरच असते. किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष गोळा करून ते मनसेच्या माध्यमातून महापालिकेकडे सोपवले जाणार आहे. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान ही स्वच्छता मोहिम राहणार आहे.

नेमका उद्देश काय?

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई आणि कोकणातील हजारो सार्वजनिक मंडळ तसेच गणेशभक्त मोठ्या भक्तिभावाने समुद्रात गणेश मूर्तीचे विसर्जन करतात, मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांपैकी अनेक मूर्ती आणि मूर्तींचे अवशेष भरतीच्या लाटांसोबत समुद्र किनाऱ्यावर येऊन वाळूत रुततात. त्यामुळे आपल्या बाप्पाची अशी अवस्था होऊ नये म्हणून ही स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे अनंत चतुर्दशीच्या पुढच्या दिवशी या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

या भागात होणार स्वच्छता मोहिम

मुंबईमध्ये गिरगांव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा या समुद्र किनाऱ्यांवर, रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड या समुद्र किनाऱ्यांवर तर रत्नागिरीत मांडवी येथे महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबविणार आहे. मनसेचे पदाधिकारी समुद्र किनाऱ्यांवर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य गोळा करून ते महापालिका प्रशासनाकडे सोपवणार आहेत.