आपल्या आरोग्याचे स्वास्थ निरोगी रहाण्यासाठी आपण योग्य आहार घेत असतो. त्यासोबतच खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयींचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. आपल्या रोजच्या आहारात प्रत्येकजण अनेक पदार्थ खात असतो. यासोबतच आपण ते कसं खातो, हे देखील फार निर्णायक ठरतं. त्याकडेही लक्ष देणं फार गरजेचं ठरतं. अशातच त्या पदार्थांचं योग्यरित्या पचन होणे देखील फार महत्वाचं आहे. त्यातीलच एक घटक म्हणजे अन्न पूर्णपणे चावून-चघळून खाणं होय. यासाठी अनेकदा आपल्या घरातील मोठी माणसं आपल्याला अन्न व्यवस्थित चावून खा असे सल्ले वारंवार देत असतात. अन्न हळूहळू आणि नीट चावून खाल्याने कोणतीही समस्या निर्माण होत नाही. तसेच त्यामागे अनेक वैज्ञनिक कारणे देखील आहेत. कोणती आहेत ती कारणे जाणून घ्या.
जेव्हा आपण अन्न चांगल्या पद्धतीने चावून खातो. तेव्हा आपल्या तोंडामध्ये लाळ ग्रंथी अधिक लाळ तयार करतात. लाळेमध्ये एंजाइम असतात जे अन्न मऊ करण्यास मदत करतात. यामुळे पचनक्रिया सुलभ होते आणि ,अन्नातील पोषक तत्वांचे शोषण देखील चांगले होते.
आपल्या तोंडात जाणाऱ्या प्रत्येक पदार्थांसोबत लाळेची प्रक्रिया होत असते. लाळेचा ९९%टक्के भाग पाणी असले तरी चवीवर आणि आपल्याला पदार्थ खाऊन व पिऊन मिळणाऱ्या समाधानावर लाळेचा प्रचंड प्रभाव असतो. यामुळे आपण गरजेपेक्षा जास्त खात नाही. यामुळे वाढत्या वजनावर सहज नियंत्रण मिळवता येते.
अन्न व्यवस्थित सावकाशीने चावून खाल्ल्याने पचन योग्य पद्धतीने होते, त्यामुळे आपल्या मेंदूला संकेत मिळतात की पोट भरले गेलं आहे. अशाने आपण अधिकचे अन्न सेवन करत नाही.
सावकाशीने अन्न चावून खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. जेव्हा आपण पटकन खातो तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते आणि नंतर कमी होते, ज्यामुळे थकवा आणि भूक लागू शकते.
एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की अन्न सावकाशीने आणि योग्यरित्या चावून खाल्ल्याने लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.