मुंबई, सध्याच्या काळात दारू पिणे अत्यंत सामान्य बाब मानल्या जाते. मद्य सेवन करणाऱ्यांच्या संख्येत मागील काही काळत विक्रमी वाढ झाली आहे. नुकतेच न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने महिलेवर लघवी केल्याची घटना घडली. घटनेच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत होता. हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. दारूची नशा किती प्रमाणात त्रासाचे कारण बनू शकते हे जाणून लोकांनाही आश्चर्य वाटते. तुम्हाला माहीत आहे का? की दारू पिल्याने आपल्या मेंदूवर थेट परिणाम होतो. दीर्घकाळापर्यंत अल्कोहोलचे (Alcohol side effect) सेवन केल्याने मेंदूचे नुकसान होऊ शकते. आज आपण दारूमुळे होणाऱ्या हानीबद्दल जाणून घेणार आहोत.
सतत अल्कोहोलचे सेवन केल्याने मेंदूचे नुकसान होऊ शकते. काही लोकांना यामुळे स्मृतिभ्रंश सारख्या धोकादायक आजारालाही सामोरे जावे लागू शकते. अल्कोहोलच्या अल्पकालीन परिणामाबद्दल सांगायचे तर, शरीराच्या आत गेल्यावर त्याचा परिणाम लगेच मेंदूवर जातो आणि मेंदूच्या रसायनशास्त्रात बदल होतो.
त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये बदल होतात आणि न्यूरॉन्सची क्रिया दडपली जाते. त्यामुळे बोलण्यात, चालण्यात आणि गोष्टी लक्षात ठेवण्यास खूप त्रास होतो. काही लोक खूप दारू प्यायल्यानंतर बेशुध्ददेखील होतात. मेंदूचे रसायनशास्त्र बदलल्याने लोकांच्या मनःस्थितीत झपाट्याने बदल होतो. कधी ते उत्तेजित होतात तर कधी उदास होतात. कधी कधी आक्रमकही होतात.
जास्त काळ मद्यपान केल्याने मेंदूच्या न्यूरोट्रांसमीटरच्या क्रियाकलापांमध्ये बदल होतो आणि मेंदूची रचना देखील असामान्य होऊ लागते. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने मेंदूतील रक्ताभिसरण बिघडते आणि मेंदू आकुंचित होऊ लागतो. यामुळे स्ट्रोक आणि स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढतो.
मेंदूमध्ये योग्य पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हे नुकसान सुरू होते. इतकेच नाही तर मद्यपानामुळे अनेक मानसिक आरोग्याच्या समस्या सुरू होतात, ज्यामध्ये मनोविकाराचा समावेश होतो. त्यामुळे लोकांचा मूड आणि व्यक्तिमत्त्वही बदलत जाते.