Ankylosing spondylitis: भारतामध्ये संधीवाताशी निगडित आजारांचे प्रमाण वाढणारे; शरीराच्या इतर भागांचे कायमचे नुकसान होण्याचा धोका

| Updated on: Jul 12, 2022 | 4:55 PM

“र्हुमॅटोलॉजिस्ट्सची संख्या वाढविणे ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे, मात्र तोवर इतर काही उपाययोजना हाती घेता येतील. प्रथमत: पॅरामेडिकल कर्मचारीवर्ग किंवा परिचारकांना प्रशिक्षण दिल्यास आपल्याला र्हुमॅटोलॉजीचे विशेष ज्ञान असलेले परिचारक मिळू शकतील, ज्यांची उपचार करणाऱ्या डॉक्टरांना लक्षणीय मदत होऊ शकणार आहे.

Ankylosing spondylitis: भारतामध्ये संधीवाताशी निगडित आजारांचे प्रमाण वाढणारे; शरीराच्या इतर भागांचे कायमचे नुकसान होण्याचा धोका
Follow us on

मुंबईः अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस (एएस) (Ankylosing spondylitis) हा एक दुर्धर, दाहकारक आजार आहे, ज्यामुळे कालांतराने पाठीच्या मणक्याची हाडे एकमेकांना जोडली जातात. शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीच्या अनियत वागण्यामुळे हा आजार होतो. यामध्ये शरीराची यंत्रणा आपल्याच शरीरातील चांगल्या उतींवर गफलतीने हल्ला करते व त्यामुळे पाठीच्या कण्यातील सांध्यांचा दाह होतो (सूज येते). (Inflammation of the joints) या आजाराचे स्वरूप अधिकाधिक गंभीर होत जाऊ नये यासाठी त्यावर नियंत्रण आणणे महत्त्वाचे असते, असे न केल्यास हृदय, डोळे, कटिप्रदेश आणि गुडघे यांच्यासारख्या शरीराच्या इतर भागांचे कायमचे नुकसान होण्याचा धोका असतो, असं तज्ज्ञांचे मत आहे.

उपचारांना विलंब होण्याची कारणे

जागरुकतेचा अभाव हे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिससारख्या र्हुमॅटिक अर्थात संधीवाताशी निगडित आजारांच्या निदानाला होणाऱ्या विलंबामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. या विलंबासाठी कारणीभूत ठरणारी आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे विशेषज्ज्ञांची असलेली कमतरता.

र्हुमॅटोलॉजिस्ट्सची संख्या कमी

पुणे येथील र्हुमॅटोलॉजिस्ट, डॉ. प्रवीण पाटील, एमआरसीपी, एफआरसीपी, सीसीटी- र्हुमॅटोलॉजी यांनी सांगितले की, “एएसचे 0.5 टक्‍के रुग्ण भारतात असल्याचे आढळून आले आहे, तर आपल्याकडील संधीवाततज्ज्ञ अर्थात र्हुमॅटोलॉजिस्ट्सची संख्या अवघी 1200-1500 इतकी असली तरी ही तफावत प्रचंड आहे. सध्या प्रशिक्षणार्थी असलेले डॉक्टर्स, धोरणकर्ते आणि निधीपुरवठा करणाऱ्या संस्था या सर्वांनाच या स्थितीविषयी अधिक जागरुक करण्याची गरज आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये सरकार हळूहळू काही अर्थपूर्ण पावले उचलत आहेत, जिथे 3 जागा या सुपर स्पेश्यालिटी डीएम र्हुमॅटोलॉजीसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. पूर्वी यासाठी एकही जागा ठेवण्यात आलेली नव्हती.”

आजारपणाच्या सुरुवातीलाच सल्ला घ्या

र्हुमॅटोलॉजिस्ट हा एएसवरील उपचारांमध्ये पारंगत असतो आणि आजारपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच त्यांचा सल्ला घेणे अतिशय महत्त्वाचे ठऱते. र्हुमॅटोलॉजिस्ट्सकडून बायोलॉजिक्ससारख्या प्रगत उपचारपद्धतींचा वापर केला जातो. बायोलॉजिक्स म्हणजे या आजाराच्या व्यवस्थापनाच्या क्षेत्रात झालेली एक लक्षणीय प्रगती आहे, विशेषत: आजाराच्या स्थितीमध्ये बदल घडवून आणणाऱ्या पारंपरिक औषधोपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांच्या दृष्टीने हा शोध अधिकच महत्त्वाचा आहे.

ही तफावत कशी भरून काढता येईल

भारतात स्नायू व हाडांशी निगडित तसेच सांध्यांशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत आहे. मात्र ही काही नवीन समस्या नाही; अनेक दशकांपासून हे आजार आढळून येत आहे, मात्र त्यांच्याकडे सतत दुर्लक्ष होत आले आहे. याशिवाय आपल्याकडे र्हुमॅटोलॉजीचे औपचारिक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू होण्यासाठी 80 व्या दशकाचा उत्तरार्ध उजाडावा लागला. योग्य प्रशिक्षणाची आणि चिकित्सेची ही कमतरता खूप काळासाठी राहिल्याने एक दरी निर्माण झाली आहे.

दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया

“र्हुमॅटोलॉजिस्ट्सची संख्या वाढविणे ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे, मात्र तोवर इतर काही उपाययोजना हाती घेता येतील. प्रथमत: पॅरामेडिकल कर्मचारीवर्ग किंवा परिचारकांना प्रशिक्षण दिल्यास आपल्याला र्हुमॅटोलॉजीचे विशेष ज्ञान असलेले परिचारक मिळू शकतील, ज्यांची उपचार करणाऱ्या डॉक्टरांना लक्षणीय मदत होऊ शकणार आहे. याबरोबरच डॉक्टरांना प्रशिक्षित करण्यासाठी खासगी संस्थांमध्ये फेलोशिपच्या रूपात विना-मान्यता ट्रेनिंग पोस्ट्सची संख्या वाढवता येतील. देशामध्ये एएसच्या उपचारांना बायोलॉजिक्ससारख्या आजार बळावण्याची प्रक्रिया कमी करण्यासाठी मदत करणाऱ्या आणि एएसमधील वेदना कमी करणाऱ्या प्रगत वैद्यकीय उपचारपद्धतींचे सहाय्य मिळेल.”

र्हुमॅटोलॉजी अभ्यासक्रम नाही

यावेळी डॉ. पाटील यांनी सांगितले की, चेन्नई येथील कन्सल्टन्ट र्हुमॅटोलॉजिस्ट डॉ. एम हेमा सांगतात, “र्हुमॅटोलॉजी ही एक दुर्मिळ सुपर स्पेश्यालिटी आहे आणि म्हणूनच अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये र्हुमॅटोलॉजी अभ्यासक्रम नसतात. यामुळे भारतामध्ये र्हुमॅटोलॉजिस्ट्सची कमतरता निर्माण झाली आहे. ऑटोइम्युन आजारांची संख्या वाढत असताना भारतामध्ये र्हुमॅटोलॉजिस्ट्सची गरजही वाढत आहे. रुग्णांच्या कल्याणाच्या दृष्टीने वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नवीन र्हुमॅटोलॉजी विभाग विकसित करणे, त्यात गुंतवणूक करणे व त्याचबरोबर हे अभ्यासक्रम अधिक मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे आपण समजून घ्यायला हवे. र्हुमॅटोलॉजिस्ट्सची संख्या वाढेल तसे रुग्णही या आजारांविषयी अधिक जागरुक होती व त्यामुळे त्यांना योग्य निदान आणि उपचार प्राप्त करता येतील. नियमितपणे उपचार घेणे ही एएसच्या व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे आणि र्हुमॅटोलॉजिस्ट्स हीच गोष्ट रुग्णांना समजावू शकतील.”

रुग्णांमध्ये जागरुकता आणणे

र्हुमॅटोलॉजी चिकित्सा ही केवळ डॉक्टरांच्याच नव्हे तरफिजिओथेरपीस्ट्स, ऑक्युपेशनल थेरपीस्ट्स, नर्सेस, सायकोलॉजिस्ट्स आणि इतर कर्मचाऱ्यांसारख्या पुरक आरोग्यकर्मींच्या (auxiliary health professionals -AHP) प्रशिक्षणावर आधारलेली असावी. या बहुशाखीय दृष्टीकोनामुळे र्हु्मॅटोलॉजीवरील चिकित्सा ही फक्त औषधे पुरविण्यापुरतीय मर्यादित राहू नये याची खबरदारी घेतली जाईल. या चिकित्सेचा भाग म्हणून रुग्णांची सर्वंकष देखभाल घेतली जाईल, त्यांच्या विशिष्ट स्थितीनुसार त्यांना योग्य उपचार दिले जातील व रुग्णांमध्ये जागरुकता आणणे हा या सर्व प्रयत्नांचा मुख्य बिंदू असणार आहे.

सर्वसमावेशक दृष्टीकोनाची गरज

आज सांध्यांशी निगडित आजारांचा भार उचलण्यासाठी भारतामध्ये पुरेसे र्हुमॅटोलॉजिस्ट्स उपलब्ध नाहीत. अशा गंभीर टप्प्यावर एएचपी म्हणजे आपल्याजवळील एक अस्पर्शित संसाधन आहे. हे पुरक आरोग्यकर्मी र्हुमॅटोलॉजिस्ट्सच्या जबाबदाऱ्या वाटून घेऊ शकतात व या क्षेत्रातील दरी भरून काढू शकतात. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसारख्या आजाराच्या उपचार व व्यवस्थापनासाठी जीवनशैलीतील बदल आणि अधिक आरोग्यपूर्ण सवयींसह एका सर्वसमावेशक दृष्टीकोनाची गरज असते हे लक्षात घेता ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची बनली आहे. र्हुमॅटोलॉजी चिकित्सेमुळे रुग्णांना बरे वाटायला हवे, त्यांना पुढील वाटचालीसाठीचे मनोबल मिळायला हवे आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधोपचारांना त्यांनी खुलेपणाने स्वीकारायला हवे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.