Bad Food Combination with Milk : दूध हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दूध प्यायल्याने केवळ हाडेच मजबूत होत नाहीत तर संपूर्ण शरीर मजबूत होते. ते शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे. मात्र काही लोकांना दुधासोबत इतर काही पदार्थही खायला आवडतात. यामध्ये ब्रेड, पोळी किंवा इतर अनेक पदार्थांचा समावेश होतो. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या दुधासोबत सेवन केल्यास आपल्या आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशी चूक कधीही करू नये. दुधासोबत कोणते पदार्थ खाऊ नये ते जाणून घेऊया.
आंबट फळं
आंबट फळं आणि दूध यांचे मिश्रण अजिबात योग्य मानले जात नाही. त्यामुळे ते एकत्र खाणं टाळावंच. खरंतर वास्तविक, आंबट फळांमध्ये ॲसिड असते, ज्याचा दुधसोबत संयोग झाला किंवा ते दुधात मिसळल्यास पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पोटदुखी, उलट्या किंवा जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच आंबट फळं आणि दूध एकत्र सेवन करू नयेत.
टोमॅटो
जर तुम्ही टोमॅटो खाणार असाल तर त्याच्या एक तास आधी आणि नंतर तासभर दूध पिऊ नये. कारण टोमॅटो देखील आम्लयुक्त असतो, अर्थात त्यामध्ये ॲसिड असते. त्यामुळेच टोमॅटो आणि दुधाचे मिश्रण योग्य मानले जात नाही. त्यामुळे ते खाणे टाळणं चांगलं.
तिखट पदार्थ
जर तुम्ही एखादा तळलेला किंवा मसालेदार पदार्थ खात असाल तर, तो कधीच दुधासोबत खाऊ नका. अन्यथा, यामुळे तुम्हाला अपचनाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. असे केल्याने ॲसिड रिफ्लक्स देखील वाढते, जे आरोग्यासाठी अजिबात चांगले मानले जात नाही. म्हणूनच दुशासोबत असे पदार्थ खाणे टाळणे उत्तम ठरते.
प्रोटीन रिच पदार्थ
दुधामध्ये भरपूर प्रोटीन असते, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही दूध प्याल, तेव्हा इतर प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे टाळणे योग्य. नाहीतर तुमच्या पचन संस्थेवर जास्त दाब पडू शकतो. ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
दूध आणि मासे
दूध आणि मासे , हे फूड कॉम्बिनेशनही खाणे टाळावे. दूध प्यायल्यानंतर, मासे खाण्यात कमीत कमी 2 तासांचे अंतर असावे. अन्यथा पचनसंस्थेशी संबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अन्नातून विषबाधाही होऊ शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)