दूधाचा चहा पिताय …ICMR ने केले सावधान, पाहा काय केल्या शिफारसी

| Updated on: May 19, 2024 | 12:41 PM

चहा आणि कॉफी पिण्याची सवय बहुतेकांना असते. भारतीयांना चहा पिण्याची सवय असली तरी त्यांच्यासाठी ICMR संशोधकांनी त्यांच्यासाठी एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

दूधाचा चहा पिताय ...ICMR ने केले सावधान, पाहा काय केल्या शिफारसी
TEA AND COFFEE
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

चहा हे पेय म्हणजे भारतीयासाठी खूपच जिव्हाळ्याचं झालं आहे. सकाळचा कडक चहा घेत वर्तमान पत्र वाचणे हा अनेक जणांचा रोजचा शिरस्ता असतो. काही जण तर जेवल्यानंतर झोपताना कॉफी देखील पित असतात. तर काही जणांना चहाचा घोट घेतल्याशिवाय सकाळ झाल्याचा फिलच येत नाही. इतकं चहा पुराण भारतीयांच्या जीवनात सरमिसळ झालं आहे. जेवणा आधी किंवा जेवल्यानंतर जर चहा पिण्याच्या सवय तुम्हाला असेल तर सावधान. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( ICMR ) च्या पॅनल चहा आणि कॉफी या उत्तेजक पेया संदर्भात एक संशोधन जाहीर केले आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच भारतीयांसाठी 17 आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ज्यात निरोगी जीवनासाठी संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार घेण्याची शिफारस केली आहे. या मार्गदर्शक तत्वांपैकी एका संशोधनात उत्तेजक पेयासंदर्भात सूचना केलेल्या आहेत. चहा आणि कॉफीचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन ( NIN ) च्या संशोधन शाखेच्या वैद्यकीय पॅनेलने स्पष्ट केले आहे.

चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन असते, ते आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करते आणि शारीरिक अवलंबित्व वाढवते,’ असे ICMR च्या संशोधकांनी म्हटले आहे. या संशोधकांनी आपल्या शिफारसीमध्ये लोकांनी संपूर्णपणे चहा आणि कॉफी टाळावी असे म्हटलेले नाही. तरीही जेवण करण्यापूर्वी आणि जेवण झाल्यानंतर लागलीच चहा किंवा कॉफी पिणे बंद करावे असे म्हटले आहे. भारतीयांनी चहा आणि कॉफी या पेयांमध्ये कॅफीन घटक सामग्रीपासून अत्यंत सावध राहावे असा इशारा दिला आहे.

या मर्यादेपेक्षा चहा – कॉफी नको

एक कप (150ml ) कॉफीमध्ये 80-120mg कॅफिन असते, तर इन्स्टंट कॉफीमध्ये 50-65 mg कॅफीन असते आणि इन्स्टंट चहामध्ये 30-65mg कॅफिन असते असे ढोबळपणे मानले जाते. “चहा आणि कॉफीचे सेवन करण्यामध्ये संयम राखण्याचा सल्ला दिला जात आहे. एका दिवसात कॅफीन या घटकाचे सेवन शरीराला सहन करण्यापलिकडे म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त ( 300mg/day) होऊ नये,” असे संशोधकांनी अहवालात म्हटले आहे.

लोह शोषण्यात अडचणी

एखाद्या व्यक्तीसाठी कॅफिनची दैनिक मर्यादा जारी करण्यात आली आहे. तसेच त्यांनी लोकांना जेवणाच्या किमान एक तास आधी आणि नंतर कॉफी आणि चहा पिणे टाळण्यास सांगितले आहे. कारण या चहा किंवा कॉफी या उत्तेजक पेयांमध्ये टॅनिन नावाचे संयुग असते. जेव्हा ते सेवन केले जाते, तेव्हा टॅनिन मानवी शरीराच्या लोह शोषण्याच्या कामात व्यत्यय आणू शकते असे संशोधकांनी म्हटले आहे.

याचा अर्थ काय ?

याचा अर्थ असा की टॅनिन तुमच्या शरीराच्या अन्नातून लोह शोषणाच्या क्रियेत अडथळा आणून ते प्रमाण कमी करू शकते. टॅनिन पचनमार्गात आयर्न ( लोहाला ) बांधून ठेवू शकते, ज्यामुळे शरीराला लोह शोषून घेणे कठीण जाते. यामुळे तुम्ही खाल्लेल्या अन्नातून तुमच्या रक्तप्रवाहात प्रवेश करणाऱ्या लोहाचे प्रमाण कमी होत जाते. यामुळे तुमच्या शरीरातील लोहाची उपलब्धता कमी होते. हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोह आवश्यक आहे. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमधील प्रथिनं असून जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेते.

 ‘ॲनिमिया’ धोका उत्पन्न

हिमोग्लोबिन हे ऊर्जा उत्पादन आणि एकूण पेशींच्या कार्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. लोहाची पातळी कमी झाल्यामुळे लोहाची कमतरता आणि ‘ॲनिमिया’ सारखी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे शरीरात लोहाच्या कमतरतेचे परिणाम जाणवायला लागतात. म्हणजेच वारंवार थकवा जाणवणे किंवा ऊर्जेचा अभाव, धाप लागणे, वारंवार डोकेदुखी, विशेषत: ॲक्टिव्हीटी करताना, अशक्तपणा, हृदयाचे जलद ठोके, त्वचा पांढरी फिकट पडणे, नखे ठीसूळ होणे किंवा केस गळणे अशी लक्षणे दिसू शकतात. दुधाशिवायचा कोरा चहा घेतल्याने रक्त संचरण वाढवण्यासारखे आरोग्याचे फायदे मिळू शकतात आणि कोरोनरी आर्टरी डिसीज ( CAD) आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यात देखील कोरा चहाची मदत होऊ शकते असेही ICMR संशोधकांनी म्हटले आहे.