नवी दिल्ली : भारतात फ्लू व्हायरस इन्फ्लूएंझा (influenza) A च्या H3N2 उपप्रकारामुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे. हा आजार झपाट्याने वाढत चालल्याने अनेक लोकं त्या आजाराने ग्रस्त आहेत. मात्र यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून बहुतांश लोक याला एक गंभीर आजार समजून चिंतित झाले आहेत. अनेक नागरिकांची रोगप्रतिकारक (immunity) शक्ती देखील प्रभावित झाली आहे. अशावेळी यातून दिलासा मिळावा म्हणून बरेचसे लोक स्वत:च स्वतःवर उपचार (self medication) करण्याची चूक करत आहेत. मात्र हे गंभीर असून यामुळे काही दुष्परिणामही होऊ शकतात.
कमी माहितीमुळे लोकांना असे पाऊल उचलावे लागत आहे. मात्र अनेक डॉक्टरांनी लोकांनी स्वतःच्या मनाने औषधे घेऊन नयेत असा सल्ला दिला आहे.
सीडीसी. जीओव्ही मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, ही समस्या 5 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना सहजपणे प्रभावित करते. या फ्लूच्या विषाणूची लक्षणे दीर्घकाळ प्रभावित करू शकतात. H3N2 च्या लक्षणांमध्ये सतत खोकला येणे आणि तीव्र ताप यांचा समावेश होतो.
अनेक डॉक्टरांनी लोकांनी स्वत:च फ्लूवर उपचार करण्यावर आपले मत दिले आहे. तज्ञांच्या सांगण्यानुसार, इन्फ्लूएंझा ए व्हायरस उपप्रकार H3N2 नवीन नाही, परंतु सतत खोकला येण्यासारख्या लक्षणांमुळे लोक त्रासलेले आहेत. या स्थितीत स्व-उपचार टाळावे. त्याऐवजी, आरोग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेणे उत्तम ठरते. तसेच यामध्ये घाबरण्याचे काही कारण नाही असेही त्यांनी नमूद केले.
बहुतेक फ्लूमध्ये खोकला, ताप किंवा इतर सामान्य समस्या असू शकतात, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण स्वत:च्या मनाने औषधे घेऊन उपचार सुरू केले पाहिजेत. भारतात या फ्लूच्या विषाणूमुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून या रोगाचा प्रसार वेगाने होत आहे. याच पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा तसेच मास्कचा नियमित वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
ज्या लोकांना दीर्घकाळ खोकल्याची समस्या आहे अशा लोकांमध्ये इतर आरोग्य समस्यांचाही समावेश होतो. याशिवाय कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती हे एक मोठे कारण आहे. अशा परिस्थितीत लहान मुलं आणि वृद्धांनी स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांनी पहाटे आणि संध्याकाळी थंड वातावरणात बाहेर पडणे टाळावे. तसेच, स्वत:च्या मनाने औषधोपचार करणेही धोकादायक ठरू शकते.
H3N2 ची लक्षणे
– खोकला
– सर्दी
– 100 डिग्रीपेक्षा जास्त ताप
– अशक्तपणा जाणवणे
– श्वास घेण्यास त्रास होणे
– श्वासोच्छवासाचा वेग वाढणे
– छातीत दुखणे
– अंगदुखी
– शरीरातली पाण्याची पातळी कमी होणे
– अचानक चक्कर येणे
काळजी कशी घ्यावी ?
– सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा
– गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा
– हात स्वच्छ ठेवा. सॅनिटायझरचा वापर करा.
– डोळे, नाकाला, तोंडाला वारंवार स्पर्श करु नका
– खोकताना किंवा शिंकताना मास्क लावा
– सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
– भरपूर पाणी प्या
– ताजी फळे आणि फळांचा रस यांचे सेवन करा.
– पौष्टिक आहाराचे सेवन करून प्रतिकारशक्ती वाढवा.
– नियमित व्यायाम करा.