नवी दिल्ली – ॲसिडिटी (acidity) हा पोटाशी संबंधित असा आजार आहे, ज्याचा त्रास कोणालाही होऊ शकतो. ॲसिड रिफ्लेक्स, छातीत जळजळ होणे किंवा अपचन यासारख्या पोटाशी संबंधित समस्याही ॲसिडिटीमुळे होतात. जर तुमचे पोट अशक्त किंवा कमकुवत असेल तर तुम्हाला वारंवार या त्रासाचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा एखादा पदार्थ खाल्यानंतर किंवा रात्री जेवल्यानंतर लगेच ॲसिडिटीचा त्रास होतो. आणि हा त्रास थांबवण्यासाठी काही औषधेही (medicines) घ्यावी लागतात. मात्र वारंवार औषधे घेणे हे आरोग्यासाठीही चांगले ठरत नाही. त्यामुळेच कोणते पदार्थ (food) अथवा कोणत्या गोष्टी या ॲसिडिटीसाठी कारणीभूत ठरत आहेत हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थ असे आहेत, ज्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो, ते कोणते हे जाणून घेऊया.
मसालेदार पदार्थ
जर तुम्हाला हिरवी मिरची, अती तिखट चटणी, चिली फ्लेक्स यांसारखे मसालेदार पदार्थ खायला आवडत असतील तर तुम्हाला हमखास ॲसिडिटीचा त्रास होईल. ॲसिडिटीपासून मुक्त होण्यासाठी, तुम्हाला मसालेदार आणि मिरची असलेल्या अन्नपदार्थांपासून दूर राहावे लागेल. असे अन्न रोज खाल्ल्याने छातीत जळजळ आणि ॲसिडिटी होते, जे बरे होण्यासाठी काही महिने लागू शकतात.
लोणचं
जर तुम्हाला तुमच्या रोजच्या जेवणासोबत लोणचं खायची सवय असेल तर तुम्हाला ही सवय बदलावी लागेल. साधारणपणे लोणच्यामध्ये व्हिनेगर टाकले जाते, ज्यामुळे अनेक महीने लोणचं खराब होत नाही व बराच काळ टिकतं. मात्र हे व्हिनेगर ॲसिडिक म्हणजेच आम्लीय असते. विविध प्रकारच्या लोणच्यांमध्ये जास्त प्रमाणात मसाले आणि तेलही टाकले जाते, जे पोटासाठी चांगले नसते. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास टाळायचा असेल तर लोणच्यापासून दूर रहा.
कोल्डड्रिंक्स / शीतपेये
जर तुम्हाला कोल्ड्रिंक अथवा शीतपेय प्यायला आवडत असेल तर त्यापासून दूर राहून हेल्दी ड्रिंक्स प्यायची वेळ आली आहे. या कोल्डड्रिंक्समध्ये पोषक तत्वं शून्य असतात, मात्र त्यांच्या सेवनाने वजन वाढते. तसेच ॲसिडिटीसारख्या पोटाशी संबंधित समस्यांनाही आमंत्रण मिळते. कोल्ड्रिंक आणि सोडा याऐवजी ताजी फळे आणि भाज्यांचा रस प्यावा किंवा नारळ पाणी प्यावे.
कॉफी
कधीकधी कॉफीही ॲसिडिटीसाठी कारणीभूत ठरू शकते. दिवसभरात एखादा कप कॉफी प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही, पण जर तुम्ही दिवसभरात कॉफीचे अनेक कप रिचवत असाल तर तुमच्या आरोग्याची हानी होऊ शकते. कॉफीमुळे केवळ ॲसिड रिफ्लेक्स होत नाही तर चिंताही वाढू शकते, तसेच झोपेची समस्या, डोकेदुखी, अस्वस्थता आणि हृदयाची धडधड या समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर कॉफीचे अतिसेवन बंद करावे.
साखर
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण ॲसिडिटी होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे साखर होय. आपल्यापैकी बहुतांश लोक हे रोजच्या आहारात साखर खातात. चहा, कॉफी, मिठाई, गोड पदार्थ यांच्या माध्यमातून साखर आपल्या पोटात जात असते. साखर ही मुळातच ॲसिडिक असते, ज्यामुळे ब्लड शुगर वाढते तसेच वजनही वेगाने वाढते. तुम्ही पांढऱ्या साखरेऐवजी गूळ किंवा मध वापरू शकता.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)