कोणतीही लस घेण्यापूर्वी ‘हे’ काम करणे अत्यंत महत्वाचे, अन्यथा होणार नाही परिणाम

| Updated on: Mar 16, 2023 | 7:42 AM

Vaccination Tips: शिकागो विद्यापीठात केलेल्या संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, कोणत्याही प्रकारची लस घेण्यापूर्वी चांगली झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या लसीचा शरीरावर चांगला परिणाम होतो.

कोणतीही लस घेण्यापूर्वी हे काम करणे अत्यंत महत्वाचे, अन्यथा होणार नाही परिणाम
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : सध्या H3N2 या इन्फ्लूएंझा विषाणूची (virus) प्रकरणे वाढत असून देशभरात तीनपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. तसेच या दरम्यान कोरोनानेही (corona) पुन्हा डोकं वर काढलं असून ती प्रकरणेही वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारने अलर्ट जारी केली असून सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे. आजकाल विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या लसी (vaccination)उपलब्ध आहेत. करोडो लोकांनी कोविड लस घेतली आहे. इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये आता वाढ होत असल्याने या विषाणूविरूद्ध लसीकरण करण्याचा सल्लाही तज्ञ देत आहेत.

यादरम्यान, एक संशोधनही समोर आले आहे, ज्यामध्ये कोणतीही लस घेण्यापूर्वी चांगली झोप घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. चांगली झोप आल्यानंतर लसीकरण करावे, असेही त्यात म्हटले आहे.

शिकागो विद्यापीठात केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की कोणत्याही प्रकारची लस घेण्यापूर्वी कमीत कमी आठ तासांची झोप आवश्यक आहे. यापेक्षा कमी तास झोप घेतल्यास शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. या संशोधनाच्या लेखिका इव्ह व्हॅन यांच्या सांगण्यानुसार, चांगली झोप घेतल्याने लसीचा शरीरावर आणखी चांगला परिणाम होतो.

हे सुद्धा वाचा

रात्री नीट झोप न लागण्याचे नुकसान

या संशोधनात संशोधकांचे असे म्हणणे आहे की, लसीचा शरीराला अधिक चांगला फायदा व्हावा यासाठी रात्रीची झोप नीट होणे अत्यंत आवश्यक आहे. झोपेचे चक्र बिघडले तर लसीतून मिळालेल्या प्रतिकारशक्तीवरही त्याचा परिणाम होतो. लसीकरणापूर्वी चांगली झोप घेतली तरच लसीचा परिणाम चांगला होतो. संशोधनात शास्त्रज्ञांनी असेही नमूद केले आहे की, लस दिल्यानंतर शरीरावर कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया आली आहे यावरूनही लसीचा परिणाम ठरतो. लसीनंतर कोणतेही गंभीर दुष्परिणाम होत नसतील तर याचा अर्थ लसीचा योग्य परिणाम होत आहे.

फ्लूची लस घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

सध्या देशात इन्फ्लूएंझाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत फ्लूची लस घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की फ्लूची लस घेतल्याने 80 टक्के इन्फ्लूएंझा टाळता येऊ शकतो. जास्त धोका असलेल्या लोकांना ही लस घेणे आवश्यक आहे. ज्या लोकांना आधीच गंभीर आजार आहे त्यांना आणि वृद्ध व्यक्तींना फ्लूची लस देऊन गंभीर लक्षणांपासून संरक्षण मिळू शकते.

ही आहेत इन्फ्लूएंझाची लक्षणे

– खोकला

– सर्दी

– 100 डिग्रीपेक्षा जास्त ताप

– अशक्तपणा जाणवणे

– श्वास घेण्यास त्रास होणे

– श्वासोच्छवासाचा वेग वाढणे

– छातीत दुखणे

– अंगदुखी

– शरीरातली पाण्याची पातळी कमी होणे

– अचानक चक्कर येणे

काळजी कशी घ्यावी ?

– सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा

– गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा

– हात स्वच्छ ठेवा. सॅनिटायझरचा वापर करा.

– डोळे, नाकाला, तोंडाला वारंवार स्पर्श करु नका

– खोकताना किंवा शिंकताना मास्क लावा

– सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

– भरपूर पाणी प्या

– ताजी फळे आणि फळांचा रस यांचे सेवन करा.

– पौष्टिक आहाराचे सेवन करून प्रतिकारशक्ती वाढवा.