नवी दिल्ली – आपल्या शरीरामध्ये ब्लड क्लॉट्स (blood clots) म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या तयार होत असतात. शरीराला एखादी दुखापत झाली किंवा कापले गेले तर त्यानंतर होणारा रक्तस्त्राव रोखण्यासाठी होणारी ही (गुठळ्या) एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र जेव्हा या गुठळ्या स्वत:च विरघळत नाहीत तेव्हा ते धोकादायक ठरू शकते. या स्थितीला थ्रॉम्बोसिस (thrombosis) असे म्हटले जाते. रक्ताच्या या गुठळ्या हृदयाच्या धमन्यांमध्ये तयार होऊ लागल्यास परिस्थिती घातक होऊ शकते. या कारणामुळे हृदयविकाराचा झटकाही (heart attack)येऊ शकतो.
कोव्हिडनंतर हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. याच कारणामुळे हृदयविकाराचा झटका येण्याच्या केसेसही वाढताना दिसत आहेत.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, कोविड-19 नंतर झालेल्या परिणामांसंदर्भात करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, ज्या व्यक्तींना कोविडचा संसर्ग झाला होता, त्यांना साधारण एका वर्षानंतरही हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका असतो. कोविडमुळे रक्ताच्या गुठळ्यांशी संबंधित जोखमीत वेगाने वाढ होत आहे. याचमुळे लोकांना हृदयविकाराचा झटका येणे, स्ट्रोक यासह अन्य समस्यांचा सामना रावा लागत आहे.
ब्लड क्लॉट्स धोकादायक का ठरतात ?
रक्ताच्या गुठळ्या होणे हे धोकादायक आहे कारण त्यामुळे हृदयातील रक्ताभिसरण थांबू शकते, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत हृदयाचे कार्य नीट चालत नाही. बऱ्याच वेळेस संपूर्ण धमन्यांमध्ये रक्ताची गुठळी होऊ शकते, ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करता येत नाही आणि हृदयविकाराचा झटका येतो. रक्ताची ही गुठळी हृदयाऐवजी मेंदूत झाली तर स्ट्रोक येण्याचा धोका असतो. कोविडमुळे अनेक रुग्णांना रक्ताच्या गुठळ्या होत आहेत, त्यामुळेच कोरोना महामारीपासून हार्ट ॲटॅक आणि स्ट्रोक्सच्या केसेसमध्ये वाढ होताना दिसत आहे.
अशावेळी हृदयातील ब्लड क्लॉट्सबद्दल वेळीच कळण हे गरजेचे असते. त्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या करता येतात. एमआरआय (MRI) आणि ट्रेडमिल टेस्ट या चाचण्यांद्वारे ही समस्या आहे की नाही हे सहजरित्या कळू शकते. त्याशिवाय शरीराच्या कोणत्याही भागात रक्ताची गुठळी होण्याची शक्यता आहे का हे या 4 लक्षणांवरून दिसून येते.
ब्लड क्लॉट्स होण्याची लक्षणे
1) त्वचेचा रंग निळा होणे
2) सूज येणे
3) छातीत अचानक तीव्र वेदना होणे
4) श्वास घेण्यास त्रास होणे
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)