मुंबई : रक्तदान म्हणजेच ब्लड डोनेशन (Blood Donation) द्वारे दरवर्षी लाखो लोकांचा जीव वाचवता येऊ शकतो. स्वस्थ आणि निरोगी लोकांनी रक्तदान करावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते. त्यांच्या रक्तदानामुळे, आजारांशी लढणाऱ्या लोकांना वेळ पडल्यास रक्त मिळू शकते. ज्या लोकांची तब्येत चांगली आहे, जे निरोगी आहेत ते लोक वेळोवेळी रक्तदान करू शकतात. मात्र एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा त्यांना तब्येतीचा कुठलाही त्रास होत असल्यास डॉक्टरांचा (Doctors) सल्ला घेतल्यानंतरच रक्तदान करावे. जगभरात लाखो लोक मधुमेह म्हणजेच डायबिटीसशी (Diabetes) लढा देत आहेत. मात्र तरीही बऱ्याच मधुमेह ग्रस्तांना रक्तदान करण्याची इच्छा असते. मधुमेह झालेले रुग्ण रक्तदान करू शकतात का , ते सुरक्षित आहे का ? याबद्दल विस्ताराने माहिती जाणून घेऊया.
हेल्थलाइनच्या अहवालानुसार, मधुमेह झालेल्या व्यक्तीही रक्तदान करू शकतात. साधारणत: टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीस झालेल्या रुग्णांनी रक्तदान करणे सुरक्षित असते, मात्र ते पूर्णपणे त्यांच्या तब्येतीवर अवलंबून असते. जर तुमचा मधुमेह नियंत्रणात असेल आणि तुम्हाला इतर कुठलाही आजार झालेल नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानंतर तुम्ही रक्तदान करू शकता. मात्र रक्तदान करण्यापूर्वी तुमची आरोग्य तपासणी करावी लागेल. मधुमेहाच्या ज्या रुग्णांना हृदयविकार किंवा इतर गंभीर आजार आहेत, त्यांना रक्तदान न करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच मधुमेहाच्या रुग्णांना रक्तदान केल्यावर कोणताही त्रास जाणवल्यास, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तदान करण्यापूर्वी काही काळजी घेणे महत्वपूर्ण आहे. असे केल्याने त्यांना कोणताही त्रास होत नाही. रक्तदान करण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे. तसेच रक्तदान करण्यास जायचे असेल त्याच्या 1 ते 2 आठवडे आधी लोहयुक्त पदार्थ किंवा सप्लीमेंट्स खाव्यात. 8 तास किंवा त्यापेक्षा जास्त झोप आवर्जून घ्यावी. पुरेसा पोषक आहार घ्यावा आणि वेळोवेळी नीट खात रहावे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे अत्यंत महत्वाचे असते. पोषक आहार घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसेच कॅफेनचे सेवन कमीतकमी करावे. त्याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांची औषधे वेळच्यावेळी घ्यावीत, ते कधीही विसरू नये. डॉक्टरांच्या संपर्कात रहावे आणि काही त्रास झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
(टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)