नवी दिल्ली – जगातील अनेक देशांमध्ये शतकानुशतके मांजर (Cat) पाळण्याची परंपरा सुरू आहे. अमेरिकेतील सुमारे 8.5 कोटी लोक त्यांच्या घरात मांजर पाळतात. अनेक लोकांचं त्यांच्या मांजरींवर मुलांसारखं प्रेम असतं. अशा लोकांना मांजरप्रेमी किंवा कॅट लव्हर्स म्हटले जाते. पण मांजरीचे संगोपन केल्याने मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? आत्तापर्यंत अनेक अभ्यासांमधून हे समोर आले आहे की मांजर पाळणाऱ्या लोकांना इतर लोकांच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोका कमी असतो. मानसिक आरोग्य (Mental Health) सुधारण्यासाठी देखील मांजर महत्वाची भूमिका बजावते, असे दसून आले आहे.
याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया
हजारो वर्ष जुनं आहे मानवाचे मांजरीशी नातं
एका रिपोर्टनुसार, मानव आणि मांजर यांच्यातील संबंध 9500 वर्षांपेक्षा जुने आहे. मानव आणि मांजर यांच्यातील परस्पर संबंधाचा सर्वात जुना पुरावा 5300 वर्षांपूर्वी चीनच्या एका गावात सापडला होता. इजिप्शियन लोकं मांजरीला दैवी उर्जेचे प्रतीक मानत असत. पॅरिसमधील फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चच्या संचालिका डॉ. इवा मारिया गिगल यांच्या सांगण्यानुसार, धान्याचे उंदरांपासून संरक्षण करण्यासाठी सर्वप्रथम लोकांनी मांजर पाळणे सुरू केले. धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांना मांजर खाईल व धान्याचे रक्षण होईल, हा त्यामागचा हेतू होता. हळूहळू मांजरांनी माणसांशी व त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेतलं आणि दोघांमधील नातं घट्ट होत गेलं.
मांजर पाळणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो ?
2008 साली अमेरिकन स्ट्रोक असोसिएशनची एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये एक संशोधन सादर करण्यात आले होते. मांजर पाळणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका इतर लोकांच्या तुलनेत सुमारे 33% कमी होतो, असे त्यामध्ये (संशोधनात) सांगण्यात आले होते. मांजर पाळणाऱ्या लोकांचा तणाव आणि एंक्झायटी (चिंतेची पातळी) देखील कमी झाली, ज्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून आल्याचेही त्यात नमूद करण्यात आले होते. या संशोधनासाठी सुमारे 10 वर्षे अभ्यास करण्यात आला, ज्यामध्ये 4000 हून अधिक अमेरिकन लोकांचा समावेश होता.
तसेच कुत्रा पाळणाऱ्या लोकांपेक्षा मांजर पाळणाऱ्या लोकांचा ताण आणि रक्तदाब कमी असतो, असा खुलासाही या संशोधनात करण्यात आला होता. अशा (मांजर पाळणाऱ्या) लोकांचा हार्ट रेटही खूप उत्तम होता. यामागचे कारण म्हणजे, कुत्र्यांकडे मालकाचे लक्ष असणे आवश्यक असते, पण मांजरी मात्र त्यांची स्वतःची काळजी घेऊ शकतात. यामुळे लोकांना खूप दिलासा मिळतो आणि त्यांना बरं वाटतं. यामुळेच अमेरिका आणि युरोपमधील बहुतांश लोक कुत्र्याऐवजी मांजर पाळण्यास प्राधान्य देतात.