नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून राजधानी दिल्लीतही कोरोनाचे (corona cases in Delhi) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या 500 च्या पुढे गेली आहे. राजधानीत सकारात्मकता दर अर्थात पॉझिटिव्हिटी रेट (positivity rate) झपाट्याने वाढत आहे. दोन जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण 13 टक्क्यांच्या पुढे गेले आहे. दिल्लीच्या पूर्व जिल्ह्यात 13.1 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि दक्षिण दिल्लीत 13.8 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे. म्हणजेच या दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येक 100 चाचण्यांमागे कोविडचे 14 रुग्ण (covid patients) आढळून येत आहेत. गेल्या एका आठवड्यापासून कोविडचा आलेख सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.
दिल्लीच्या आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना रूग्णांच्या चाचण्या वाढवण्याचे आणि जीनोम सीक्वेंन्सिंग वाढवण्याचे आदेश दिले आहेत. डॉक्टरांनीही लोकांना कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविडची प्रकरणे सातत्याने वाढत असून अशा परिस्थितीत लोकांनी सावध राहण्याची गरज आहे, असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे. कोरोनाला हलक्यात घेऊ नये. वृद्ध व्यक्ती किंवा जुनाट आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना संसर्ग झाल्यास त्यांना धोका असू शकतो, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
हॉस्पिटलायझेशन मध्येही होत आहे वाढ
दिल्लीतील लोकनायक रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, गेल्या तीन महिन्यांत एकही कोविड रुग्ण रुग्णालयात दाखल झाला नव्हता, परंतु आता गेल्या काही दिवसांपासून रुग्ण दाखल होत आहेत. सध्या रुग्णालयात दोन कोरोना रुग्ण दाखल आहेत. रूग्णालयात येणार्या बहुतेक रूग्णांमध्ये केवळ सौम्य लक्षणे आहेत. लोकं खोकला, सर्दी आणि सौम्य ताप आल्याची तक्रार करत आहेत. तर काही रुग्णांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी कोविड वॉर्ड तयार आहेत. रुग्णांची संख्या वाढल्यास आणखी खाटांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
ओमिक्रॉन XBB.1.16 व्हेरिअंटच्या केसेसही वाढल्या
तज्ञांचे म्हणणे आहे की कोविडच्या XBB.1.16 प्रकारामुळे अनेक राज्यांमध्ये प्रकरणे वाढत आहेत. हा प्रकार वेगाने पसरत आहे आणि लोकांना संक्रमित करत आहे. याशिवाय हवामानात होणारा बदल आणि लोकांचे दुर्लक्ष हेही विषाणू वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. सध्या तरी लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. तज्ञांनी लोकांना मास्क घालण्याचा आणि गर्दीत न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायजर वापरणे, अशी काळजीही नीट घ्यावी असा सल्ला डॉक्टर देत आहेत.