नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा (corona) धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना आणि इन्फ्लूएंझा व्हायरसच्या (virus) परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक (meeting) घेतली. यामध्ये कोविड रोखण्यासाठी चाचणी, ट्रॅक, उपचार आणि लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात आला. तसेच नागरिकांनाही सतर्क राहण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशातील कोरोनाच्या प्रकरणांबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासांत 1100 हून अधिक नवीन रुग्णांची (new cases) नोंद झाली आहे. दिवसेंदिवस प्रकरणे वाढत आहेत. देशातील चार राज्यांमध्ये हा विषाणू झपाट्याने पसरत आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि केरळमध्ये कोविडचे सक्रिय रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.
आकडेवारीवर नजर टाकायची झाली तर सध्या देशात कोविडचे 7026 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी 4650 प्रकरणे फक्त या चार राज्यांमध्ये आहेत. म्हणजेच एकूण सक्रिय प्रकरणांपैकी 66 टक्के प्रकरणे या राज्यांतील आहेत. यापैकी केरळ (1921) आणि महाराष्ट्र (1489) या दोन राज्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. गुजरात (916) आणि कर्नाटकमध्ये संसर्गाचे 624 सक्रिय रुग्ण आहेत. या चार राज्यांमध्ये कोविडचा सकारात्मकता दर अर्थात पॉजिटिव्हिटी रेटही वाढत आहे.
का वाढत आहेत केसेस ?
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, सतत बदलते हवामान, निष्काळजीपणामुळे लोकांनी केलेले दुर्लक्ष आणि XBB 1.16 व्हेरिएंट हे कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण आहे. या ऋतूत विषाणू सक्रिय होतात. श्वसनाचे आजार होऊ लागतात आणि खोकल्यामुळे आणि शिंकण्याने विषाणू पसरू लागतात. गेल्या काही महिन्यांपासून लोकांनीही याबाबत खूप निष्काळजीपणा केला आहे. मास्कचा वापर केला जात नाही आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊनही लोकं मास्क वापरत नाहीत. त्यामुळे विषाणू पसरण्याची संधी मिळत आहे. त्याच वेळी, Omicron चे XBB 1.16 प्रकार देखील पसरत आहे. याचा लोकांना झपाट्याने संसर्ग होत आहे.
निष्काळजीपणा टाळा
लोकांनी यावेळी कोविडबाबत गाफील राहू नये, असा इशारा ज्येष्ठ डॉक्टरांनी दिला आहे. कोविडचा धोका आता काही आठवडे राहू शकतो. या प्रकरणात, निष्काळजीपणामुळे, प्रकरणे आणखी वेगाने वाढू शकतात. म्हणूनच कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. विशेषत: वृद्ध व्यक्ती आणि किडनी, हृदय व इतर गंभीर आजारांच्या रुग्णांनी तसेच लहान मुलांनीह विशेष काळजी घ्यावी.