नवी दिल्ली : देशभरात कोविडचा संसर्ग पुन्हा (covid cases rising again) वेगाने वाढू लागला असून लहान मुलांवरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे. अनेक नवजात बालके, आणि लहान मुलं (infants and small kids) या संसर्गाने ग्रस्त होत आहे. त्यांच्यापैकी अनेकांना खूप ताप (fever), खोकला, आणि डोळ्यांना खाज सुटणे (itchy eyes) आणि डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा दाह होणे असा त्रास जाणवत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
सुरुवातीपासून, कोविड हा मुलांमध्ये दुर्मिळ आणि सौम्य होता. परंतु संक्रमित झालेल्यांपैकी काही मुलांना गंभीर मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम (multisystem inflammatory syndrome- MIS) चा सामना करावा लागला. या स्थितीमध्ये हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड, मेंदू, त्वचा, डोळे किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अवयवांसह शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना सूज येऊ शकते. मात्र, यावेळेस (मुलांच्या )डोळ्यांना खाज सुटण्यासारखी नवीन लक्षणे दिसत आहेत जी पूर्वी आलेल्या कोविड वेव्हमध्ये दिसली नव्हती.
“6 ते 11 महिने वयोगटातील लहान मुलांमध्ये SARS-CoV2 साठी सकारात्मक RT-PCR असून, त्यासह तीव्र तापाचा आजार अचानक सुरू झाला आहे,” असे डॉक्टरांनी सांगितले. “बहुतेक मुलांना ब्राँकायटिसच्या वैशिष्ट्यांसह मध्यम ताप, सर्दी आणि सौम्य खोकला झाल्याचे दिसून आला. पण यात सध्या जाणवलेले एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे काही मुलांमध्ये कंजक्टिव्हायटिस ( डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा दाह होणे) ची लक्षणे दिसून येत आली , जी पूर्वी दिसली नव्हती,” असेही डॉक्टरांनी नमूद केले.
लहान मुलांमधील कोविड संसर्ग, जो सहा महिन्यांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा समोर आला आहे, तो पुरळ आणि इतर वैशिष्ट्यांसह होणारा MIS-C नसल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
“लहान मुलांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यांना साध्या श्वसन संसर्गाच्या तक्रारीमुळे डॉक्टरांकडे आणले जाते. पण नंतर त्यांची कोविडसाठी चाचणी केली असता त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह येतो , असे फोर्टिसमधील एका डॉक्टरांनी नमूद केले.
मुख्यतः “शाळेत जाणाऱ्या वयाच्या मुलांमध्ये , गेल्या दोन आठवड्यांपासून ताप आणि घसादुखीचा त्रास वाढू लागला आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये त्यांना कुटुंबातील (संक्रमित) सदस्यांकडून संसर्ग होत असल्याचे दिसत आहे, असे डॉक्टर म्हणाले.
अशा वेळी लहान मुलं आणि मोठी माणसं, सर्वांनीच मास्क नियमितपणे वापर केला पाहिजे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. बाहेर गेल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि हात वारंवार धुवावेत, तसेच सॅनिटायजरचाही नियमितपणे वापर करावा. उघड्यावर कुठेही थुंकणे टाळावे, या नियमांचे अवश्य पालन करावे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात सोमवारी 5,880 कोरोना व्हायरसची प्रकरणे नोंदली गेली. देशभरात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 35,199 वर पोहोचली असून व्हायरसमुळे 12 मृत्यू झाले आहेत.