Covid 19 Voice Test | जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाविरोधात (Covid -19) लस तयार करण्यात आली आहे. त्याला अटकाव करण्यासाठीही अनेक औषधं बाजारात दाखल झालेली आहे. कोरोनो निदानाचे अनेक पर्यायही समोर आले आहेत. घरबसल्या कोरोना चाचणीची किट (Corona Text Kit) ही आली आहे. तरीही नाक आणि तोंडावाटे कोरोना चाचणीची अडचण आहेच. हा प्रकार काहींना किळसवाणा वाटतो. पण रोगाचे निदान करायचे तर हा प्रकार करावाच लागतो. आता केवळ आवाजावरुनच तुम्हाला कोरोना (Covid 19 Voice Test) झाला की नाही याचे निदान होणार आहे.
नेदरलँडच्या Maastricht University च्या Institute of Data Science ने हे अॅप विकसीत केले आहे. संशोधनकर्त्यांचा दावा आहे की, केवळ आवाजाच्या नमुन्यावरुनच तुम्हाला कोरोना झाला आहे की नाही याची तात्काळ माहिती मिळेल.
हे अॅप विकसीत करणाऱ्या संशोधन टीमचे संशोधक वफा अलजबवी यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. त्यानुसार, अॅपच्या (App) माध्यमातून केवळ आवाजाच्या सहाय्याने तुम्हाला कोरोना झाला की नाही याचे निदान अवघ्या एका मिनिटात करण्यात येईल.
मीडियातील अहवालानुसार, या App ची चाचणी यशस्वी झाली आहे. केम्ब्रिज युनिर्व्हसिटीत 4,352 रुग्णांवर याविषयीचे संशोधन करण्यात आले. त्यांच्या आवाजाच्या नमुन्यावरुन त्यांना कोरोना झाली की नाही याची माहिती मिळाली आहे.
संशोधकांच्या दाव्यानुसार, कोरोनाग्रस्ताच्या आवाजात बदल होतो. या आवाजाच्या नमुन्याआधारे कृत्रिम बुद्धीमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलीजेंस (AI)) वापर करुन कोरोनाचे निदान होईल.
संशोधन टीमचा दावा आहे की, ज्या देशात कोरोना निदानासाठी आरटी-पीसीआर चाचणीचा खर्च महागडा आहे. त्याठिकाणी या अॅपचा मोठा फायदा होईल. अगदी स्वस्तात लोकांना कोरोना झाली की नाही याची माहिती मिळेल. या अॅपच्या माध्यमातून कोरोनाची 89 टक्के अचूकतेची पडताळणी केल्याचा दावा करण्यात येत आहे.