भारतात अद्यापही ओमिक्रॉन प्रकारामुळे धोका कायम आहे, गंभीर बाब म्हणजे देशातील लहान मुलांना देखील आता कोविडच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन संसर्गाच्या (Omicron infection) विळख्यात ओढल्याचे दिसत आहेत. नुकत्याच आलेल्या अहवालावरून, या वेळी मुलांमध्ये अशी काही लक्षणे दिसून येत आहेत जी असामान्य आणि अत्यंत चिंताजनक आहेत. सामान्यतः कमी गंभीर मानले जाणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या हाँगकाँगमधील मुलांमध्ये गंभीर वैद्यकीय जटिलता (Serious medical complications) निर्माण झाल्याने जागतिक चिंता वाढली आहे. हाँगकाँगच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओमिक्रॉन संक्रमणाचा हा टप्पा अधिक आव्हानात्मक (More challenging) ठरत आहे. संसर्ग झालेल्या मुलांमध्ये ‘क्रुप रोग’ विकसित होताना दिसतो. या व्यतिरिक्त कोविड-19 मधून बरे झालेल्या मुलांमध्ये डिस्चार्ज झाल्यानंतर कमीत कमी एक लक्षण दिसून येते. अहवालानुसार, BA.4 आणि BA.5ची लागण झालेल्या 48.6 टक्के नवीन प्रकरणांमध्ये BA.2.12.1 प्रकारांमध्ये 7.6 टक्के वाढ दिसून येत आहे.
हाँगकाँग मीडिया रिपोर्ट्समधील बालरोग आणि किशोर चिकित्सा विभागाचे सल्लागार माइक क्वान यट-वाह असे म्हणतात. की, ओमिक्रॉन व्हेरियंटसह या पाचव्या लहरी दरम्यान मुलांमधील नैदानिक लक्षणे पूर्वीच्या प्रकारांपेक्षा लक्षणीय भिन्न आहेत. त्या प्रामुख्याने मुलांचा आवाज बसणे, कर्कश्श होणे, धाप लागणे श्वास घेण्यास अडचणी येणे यासारखी गंभीर लक्षणे अनेक मुलांमध्ये दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत श्वसन मार्गात अडथळा निर्माण होऊन ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. अशी प्रकरणे केवळ कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटच्या संक्रमणादरम्यानच पाहिली जात होती, आता ओमिक्रॉनमुळे उद्भवणारी ही लक्षणे खूपच भयानक बनली आहेत.
ग्लोबल टाइम्स ऑफ चायनानुसार, सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनच्या कम्युनिकेबल डिसीज डिव्हिजनचे डायरेक्टर चुआंग शुक-क्वान यांनी सांगितले, की काही संक्रमित मुलांमध्ये ‘क्रुप’ रोगदेखील विकसित झाला आहे, परिणामी असे निदर्शनास येते, की मुलांच्या श्वसन मार्गात या व्हायरसच्या संक्रमणामुळे घशात सूज येऊन श्वासोच्छवासाची समस्या वाढू शकते. डॉक्टरांच्या मते, मुलांमध्ये सर्वात सामान्य तक्रारी म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे, संज्ञानात्मक समस्या, निद्रानाश, डोकेदुखी आणि अस्वस्थता. काहींची लक्षणे झपाट्याने बदलत असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. हे सर्वच संकेत गंभीर आजारपणाचे कारण ठरत आहेत.
हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी जॉन-ली का-चिऊ म्हणाले, की ज्येष्ठ नागरिक आणि मुलांमध्ये सध्याच्या लसीकरण मोहिमेचा वेग त्यांना संसर्गापासून वाचवण्यासाठी पुरेसा नाही. अशा केसेसमध्ये कोविड-19 संसर्गानंतर गंभीर आजारांसह उच्च मृत्यू दर पाहायला मिळत आहे. देशातील 80 वर्षांवरील लोकांपैकी सुमारे 30 टक्के, 3 ते 11 वर्षे वयोगटातील 20 टक्के लोकांचे लसीकरण झालेले नाही. वेळीच लसीकरणाचे प्रमाण वाढले असते तर एवढी गंभीर प्रकरणे समोर आली नसती, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
हाँगकाँगमधील संसर्गाच्या प्रकरणावरून धडा घेत आरोग्य तज्ज्ञ म्हणतात, की कोणत्याही टप्प्यावर कोरोना संसर्गाला सहजतेने घेण्याची चुक करू नका. हे संक्रमण अजूनही बहुतांश रुग्णांमध्ये गंभीर समस्या निर्माण करताना दिसत आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये संसर्गाची लक्षणे ज्या प्रकारे दिसली आहेत, ती निश्चितच गंभीर आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण अत्यंत प्रभावी मानले जाते, अशा परिस्थितीत ज्या देशांमध्ये लसीकरणाचा वेग कमी आहे, त्यांनी लवकरात लवकर त्यात सुधारणा करून लसीकरणाची गती वाढवणे आवश्यक आहे. संक्रमणास गांभीर्याने घेऊन हाँगकाँगच्या प्रकरणातून संपूर्ण जगाने धडा घेण्याची गरज आहे.