कोरोना साथीने संपूर्ण जगाला हादरा दिला. कोरोनावरील लसीमुळे अनेकांचे प्राण वाचल्याचे सांगितले जाते. परंतू कोरोनाची लस तयार करणारी कंपनी ॲस्ट्राझेनेका हीने ( AstraZeneca ) युकेच्या कोर्टात एक कबुली दिली आहे. या लसीच्या वापराने दुर्लभ प्रकरणात साईड इफेक्ट होतो असे धक्कादायक प्रतिज्ञापत्र कोर्टात केले आहे. ॲस्ट्राझेनेकाच्या मदतीने भारतात कोव्हीशील्ड लस तयार करण्यात आली होती. भारतात दोन अब्ज लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यातील 170 कोटी लोकांना कोव्हीशील्ड लस दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात भीतीची लकेर उमटली आहे. या प्रकरणावर तज्ज्ञांचे मत काय ? याचा घेतलेला मागोवा
जोपर्यंत तज्ज्ञ व्यक्ती यासंदर्भात काही अभ्यास करुन डाटा सादर करीत नाहीत. तोपर्यंत केवळ दुर्लभ प्रकरणातच या लसीचा साईड इफेक्ट होतो अशी बोळवण सरकारने करणे योग्य नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. कोरोनाच्या लाटेनंतर जानेवारी 2020 मध्ये भारतात लसीकरणाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला केवळ अत्यावश्यक वर्गवारीतील कर्मचारी जसे डॉक्टर, नर्स, एसटी आणि बेस्ट ड्रायव्हर, रेल्वे कर्मचारी, पोलिस अशा कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतर सहव्याधी असलेल्या बुजुर्ग मंडळींचे लसीकरण करण्यात आले. आधी ठराविक रक्कम आकारुन लस देण्यात आली होती. त्यानंतर परदेशात जर लसीकरण मोफत होत आहे तर आपल्याकडे का नाही अशी टीका विरोधकांनी केली. त्यानंतर आपल्या देशात देखील नि:शुल्क लसीकरण करण्यात आले.
लंडनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्राझेनेकाने तयार केलेल्या लसीबद्दल युकेच्या कोर्टात एक गंभीर खुलासा केला आहे. या लसीच्या डोसमुळे काही दुर्मिळ प्रकरणात शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे प्लेटलेट कमी होऊन कार्डीयक अरेस्ट होऊ शकतो. ज्याला सर्वसामान्य भाषेत हार्टॲटॅक असे म्हटले जाते. कोव्हीशील्ड लसीने ब्रेनस्ट्रोक, हार्टॲटक आणि पेशींची कमतरता होणे असे साईड इफेक्ट दुर्मिळ प्रकरणात होण्याची शक्यता असल्याचा खुलासा युकेच्या कोर्टात केला गेला आहे. ॲस्ट्राझेनेका हीच कंपनी आहे जिच्या मदतीने भारतात कोव्हीशील्ड लस तयार केली होती. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठी प्राणहानी झाली होती. ब्रिटनच्या न्यायालयात कोविड मृत्यू प्रकरणाची नुकसान भरापाई प्रकरणात कंपनीने दाखल केलेल्या प्रकरणाने देशातील जनता भीतीच्या छायेत आहे. त्यांच्या मनात नाना सवाल निर्माण होत आहेत. कारण, अलिकडेच्या काळात हार्टॲटॅकने तरुणांचे ऐन उमेदीच्या काळात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.
फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्राझेनेकाने ब्रिटनच्या कोर्टात एक ॲफीडेव्हीट दाखल केले आहे. कंपनीच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या वापराने दुर्मिळ प्रकरणात थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम ( TTS ) होण्याची शक्यता आहे. हा आजार रक्ताच्या गुठळ्या होण्याशी संबंधित एक दुर्मिळ दुष्परिणाम आहे. परंतू ही माहिती नवीन नाही. येथे सर्वसामान्य लोकांसाठी लसीकरण सुरु केल्यापासून या संदर्भातील धोक्याची कल्पना आहे. लसीशी संबंधित कोणतीही प्रतिकूल घटना पहिल्या डोसच्या 21 दिवसांपासून एक महिन्याच्या आत घडली असती असे म्हटले जात आहे.
नुकसान भरपाईसाठी 51 याचिकादारांनी केलेल्या सामूहिक याचिकेत फेब्रुवारीत लंडनमधील उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ॲस्ट्राझेनेकाने कबूल केले की कोविड -19 प्रतिबंधासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने ही लस विकसित केली होती. तिच्या वापराने अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम ( TTS ) होऊ शकतो असे कंपनीने म्हटले आहे. हे वृत्त ब्रिटनचे वृत्तपत्र ‘दि डेली टेलिग्राफ’ ने प्रसिद्ध केले आहे.
‘हे मान्य आहे की ॲस्ट्राझेनेका लसीने अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये, TTS होऊ शकतो. हा कार्यकारण संबंध अद्याप समजलेला नाही. परंतू, ॲस्ट्राझेनेका लस ( किंवा कोणतीही लस ) दिली नसतानाही TTS होऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक केसची स्वतंत्र चौकशी करुन या प्रकरणातील कार्यकारण संबंध उलगडावा लागेल असे कंपनीने कोर्टात म्हटल्याचे टेलिग्राफ वृत्तपत्राच्या बातमीत म्हटले आहे. परंतू ज्यांना लस दिली त्यांना टीटीएस – हा एक दुर्मिळ सिंड्रोम थ्रॉम्बोसिस किंवा रक्त गोठणे आणि थ्रोम्बोसाइटोपेनिया किंवा प्लेटलेट्सची कमतरता यांच्या अनुषंगाचे आजार होऊ शकतो असे याचिकादारांच्यावतीने युक्तीवाद करणाऱ्या वकीलांनी म्हटले आहे.
TTS मुळे आपल्याला स्ट्रोक, मेंदूचे नुकसान, हृदयविकाराचा झटका, पल्मोनरी एम्बोलिझम आणि इतर संबंधीत संभाव्य जीवघेणा धोका निर्माण होऊ शकतो असे म्हटले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि कोविड-19 लस कोव्हीशील्डची निर्माता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या दोघांनीही आतापर्यंत या बातमीनंतर कोणतेही प्रतिक्रीया जाहीर केलेली नाही. Oxford-AstraZeneca Covid-19 लस भारतात Covishield या ब्रँड नावाने विकली जाते आहे.
भारतात या लसीसोबत दिलेल्या उत्पादन माहितीमध्ये वापरासाठी विशेष खबरदारी या विभागात TTS चा विशेष इशाऱ्याचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे आणि यातील बहुसंख्य घटना लसीकरणानंतरच्या पहिल्या 21 दिवसांत घडल्या आणि काही घटनांचे घातक परिणाम झाले आहेत असेही म्हटल्याचे कंपनीने म्हटले आहे.
ब्रिटनच्या कोर्टात केलेल्या प्रतिज्ञापत्रात आता “कोणतेही गुपित नाही” आणि कोविड -19 साथीत रुग्णाने स्वतःच बरे होण्याच्या दरम्यान आणि नंतर दोन्ही रक्ताच्या गुठळ्या तयार होणे, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो असे येथील डॉक्टरांनी म्हटले आहे.
‘न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात काही नवीन नाही. खरं तर, 2021 च्या सुरुवातीपासून ( लसीकरण लागू झाल्यानंतर लगेच ) ही गोष्ट सांगितली होती. जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) मे 2021 मध्ये याबद्दल म्हटले होते आणि 2023 मध्ये त्यात सुधारणा केली होती, ‘ असे केरळमधील नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन ( IMA ) कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी म्हटले आहे.
लसीकरणाच्या वेळी आणि त्यानंतरच्या पहिल्या महिन्यात ज्यांना पहिला डोस दिला गेला, त्यांच्यासाठी रक्तातील गुठल्या तयार होणे ही समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे आता 2024 मध्ये, लोकांना TTS चा धोका नाही. तसेच,अलिकडच्या काळात हृदयविकाराचा झटक्याची आणि ब्रेन स्ट्रोकची जी प्रकरणे घडल्याचे आपण सर्व पाहतो आहोत ती TTS मुळे होत नाहीत, हा एक अपवादात्मक दुर्मिळ साईड इफेक्ट आहे ज्यामुळे मेंदूत आणि इतर ठिकाणी रक्तात गुठळ्या होतात,’ असे डॉ. राजीव जयदेवन यांनी म्हटले आहे.
ॲस्ट्राझेनेकावर अनेक लोकांनी केसेस दाखल केल्या होत्या. याच्या लसीमुळे गंभीर आजार होत असून मृत्यू होऊ शकतो असा त्यांचा आरोप होता. अशा एकूण 50 हून अधिक याचिका ब्रिटनच्या कोर्टात दाखल झाल्या आहेत. 100 मिलीयन पौंडाची नुकसान भरपाई मागितली आहे. एप्रिल 2021 मध्ये ब्रिटनचे एक नागरिक जेमी स्कॉट यांनी लस घेतल्यानंतर लगेच त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठी होऊन रक्तस्राव झाला. तीन वेळा त्यांचे प्राण जाता जाता वाचले. त्यावेळी जेमी यांनी ॲस्ट्राझेनेकावर कोर्टात याचिका दाखल केली. त्यात त्यांनी म्हटले की या कंपनीच्या लसीमुळे खास प्रकारचा साईड इफेक्ट होतो ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो असे म्हटले होते. ब्रिटनमध्ये या साईड इफेक्टची चर्चा लसीकरणानंतर लगेच होऊ लागली होती. त्यावेळी असा पर्याय पुढे आला की 40 पेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींना लसी अपवादात्मक परिस्थितीत द्यावी कारण कोरोनाच्या धोक्यापेक्षा लसीचा धोका अधिक होऊ शकतो.
कोर्टात वकीलांनी कोर्टात युक्तीवाद केला की जेवढी आशा होती तेवढी ही लस काही सुरक्षित निघाली नाही. ब्रिटनची मेडीसिन अॅण्ड हेल्थकेअर प्रोडक्ट रेग्युलेटरी एजन्सी MHRA च्या अधिकृत आकडेवारी नुसार इंग्लंडमध्ये 80 जणांचे प्राण लसीच्या साईड इफेक्टमुळे झाले आहेत. याच्या शरीरात प्लेटलेटची संख्या कमी होण्यासोबत रक्ताच्या गाठी देखील तयार झाल्या होत्या. ज्या लोकांमध्ये अशी लक्षणे आढळली त्यातील दर पाच व्यक्तीमधील एकाचा मृत्यू या आजाराने झाला आहे.
डिसेंबर 2020 मध्ये ॲस्ट्राझेनेकाने आपल्या लसीचे इमर्जन्सी लॉंचिंग केले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन म्हटले की ब्रिटनच्या संशोधकांचे यश आहे. जगभरातील तज्ज्ञांनी देखील ब्रिटनची लस निर्धोक असल्याचा निर्वाळा दिला होता. जगभरातील नियामक संस्थांनी लस घेतल्याने रिस्क कमी होते. लसी न घेतल्याने कोरोना मृत्यूचा धोका अधिक वाढतो असे म्हटले होते. जागतिक आरोग्य संघटनेने देखील या लसीला सुरक्षित म्हटले होते. मार्च 2021 रुग्णांमध्ये एक नवीन आजार सुरु झाला. त्याचे नाव Vaccine-Induced Immune Thrombocytopenia & Thrombosis ( VITT ) असे आहे. जुलै 2021 एका सायन्स जर्नलमध्ये छापून आले की लस घेतल्यानंतर 5 ते 21 दिवसांत VITT च्या केसेस येऊ शकतात.
ऑस्ट्रीया, नॉर्वे, जर्मनीत अशा अनेक केस आढळल्या. वकीलांनी असा दावा केला की VITT हा TTS चे एक रुप आहे. यामुळे रक्ताच्या गुठल्या तयार होतात. याबद्दल तज्ज्ञांनी प्रकाश पाडायला हवा. कंपनी आधी लसीमुळे हा आजार होऊ शकतो हे मान्य करायला तयारच नव्हती. एक वर्षानंतर या कंपनीने हे मान्य केलेय की त्यांनी बनविलेल्या लसीच्या साईड इफेक्टमुळे हार्टअॅटॅक येऊ शकतो. जेमी स्कॉटच्या केसमध्ये साल 2023 कंपनीने जरेनेरिक पातळीवर आम्ही मान्य करु शकत नाही की लसीमुळे रक्तात गाठी तयार होतात. परंतू फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीने अखेर मान्य केले की त्यांच्या लसीने दुर्मिळ प्रकरणात प्लेटलेट कमी होऊ शकतात आणि रक्ताच्या गाठी होऊन ब्रेन स्ट्रोक किंवा हार्टअॅटॅक होऊ शकतो. कंपनीने हे मान्य केल्याने त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल असे म्हटले जात आहे. परंतू सरकार कंपनीच्या बाजूने उभे राहील्याने आता सरकारला ही नुकसान भरपाई नागरिकांना द्यावी लागणार आहे. परंतू प्रश्न नुकसान भरपाईचा नसून कोव्हीशील्ड घेतलेल्या एक अब्ज 70 कोटी नागरिकांच्या मनात आपल्यालाही हार्टॲटॅकचा धोका आहे का ही भीती दूर करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा असे तज्ज्ञांचे मत आहे.
भारतातही कोविड प्रतिबंधक कोव्हीशील्ड लसीच्या साईड इफेक्ट संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ॲडव्होकेट विशाल तिवारी यांनी केली याचिका दाखल केली आहे. कोव्हीशील्डच्या देशभरात 175 कोटी लसीचे डोस देण्यात आल्या आहेत. या लसीची मुख्य निर्माता कंपनी ॲस्ट्राझेनेकाने ब्रिटनच्या न्यायालयात लसीच्या साईड इफेक्टने दुर्मिळ प्रकरणात मृत्यू होऊ शकतो हे मान्य केल्याने या लसी घेतल्या अब्जावधी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ही याचिका दाखल केल्याचे वकील विशाल तिवारी यांनी म्हटले आहे.
ब्रिटनने कोरोनाच्या लसीकरणाने मृत्यू झालेल्यांना सवा करोडची नुकसान भरपाई दिली आहे. फेब्रुवारीपर्यंत एकूण 163 प्रकरणात ही नुकसान भरपाई मिळाली आहे. त्यातील 158 प्रकरणे ॲस्ट्राझेनेकाची आहेत. ब्रिटनसारख्या देशांप्रमाणेच आपल्या देशातील लसीकरणाने नुकसान झालेल्या नागरिकांना लस नुकसान भरपाई मिळणाऱ्या प्रणालीची निर्मिती करण्याची विनंती या याचिकेत केली आहे. तसेच, कोविशील्ड लसीचे दुष्परिणाम आणि जोखीम घटक तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सारख्या संस्थांतील तज्ञांचा समावेश असलेले वैद्यकीय तज्ञ पॅनेलची स्थापना करावी. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने हस्तक्षेप करून भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्य रक्षण करण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करण्याची विनंती याचिकाकर्त्याने केली आहे.
भारतात 2022 च्या आकडेवारीनूसार 47 लाख लोकांचा कोविडने मृत्यू झाला आहे. कोव्हीशील्डचा शोध लावणारी कंपनीच जर साईड इफेक्ट मान्य करीत असेल तर या प्रकरणी भारतीय मेडीकल संस्थांनी नागरिकांच्या मनातील शंका दूर करायला हवी असे म्हटले जात आहे. कारण अलिकडे अनेक तरुण खेळाडू, कलाकारांचे अभिनेत्यांचे मृत्यू हृदयविकाराने झाले आहेत.
भारतातील कोविड लसीकरणाची सुरुवात जानेवारी 2021 मध्ये सुरु झाली होती. सर्वप्रथम कोव्हीशील्डची लस तयार करण्यात आली. त्यानंतर हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने देशांतर्गत कोव्हॅक्सीन या देशी लसीची निर्मिती केली. तसेच रशियाची स्पुटनिक – V तसेच अमेरिकेची स्पाईकवॅक्स लसीला देशात परवानगी देण्यात आली.
संपूर्ण भारतात झालेले लसीकरण – 2,200 दशलक्ष ( 220 कोटी )
पहिल्या डोसची संख्या – 1,020 दशलक्ष ( 102 कोटी )
दुसऱ्या डोसची संख्या – 952 दशलक्ष ( 95.2 कोटी )
बुस्टर डोसची संख्या – 227.4 दशलक्ष ( 22.74 कोटी )
कोव्हीशील्ड घेतलेल्या लोकांची एकूण संख्या – 1,700 दशलक्ष ( 170 कोटी )
कोव्हॅक्सीन ( भारत बायोटेक ) – कोर्बेवॅक्स – 73 दशलक्ष ( 7.3 कोटी )
स्पुटनिक – 5 – 1.2 दशलक्ष
कोव्होवॅक्स – 54,932
इन्कोवॅक्स ( iNCOVACC ) – 7,610