नवी दिल्ली – थंडीच्या दिवसांत पाणी कमी (water) प्यायले जाते. लहान मुलंही तहान कमी लागल्याने फारसं पाणी पिताना दिसत नाहीत. पण पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले नाही तर डिहायड्रेशन (dehydration) होऊ शकते. डिहायड्रेशनचा त्रास झाल्यास घसा व तोंड कोरडे पडणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अनेक अभ्यासांतून अशी माहिती समोर आली आहे की डिहायड्रेशनमुळे, डोकेदुखी (head ache), एनर्जी कमी होणे, मूड (mood change) आणि मानसिक स्थिती बदलणे हे होऊ शकते.
शाळेत जाणाऱ्या मुलांना डियाहड्रेशचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. शाळेत असताना अभ्यास आणि खेळण्याच्या नादात मुलांच खाण्याकडे आणि पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. पण काही उपायांच्या मदतीने मुलांना पाणी पिण्याची सवय लावली जाऊ शकते.
मुलं डिहायड्रेट का होतात ?
हाय ॲक्टिव्हिटी लेव्हल आणि जास्त घाम येणे यामुळे मुले अनेकदा लवकर डिहायड्रेटेड होतात. लहान मुलांना मोठ्या माणसांपेक्षा जास्त घाम येतो. याशिवाय लहान मुले पाणी पिण्यासाठी अनेकदा पालकांवर अवलंबून असतात. पालकांचा निष्काळजीपणाही याला कारणीभूत ठरू शकतो.
डिहायड्रेशनचा मानसिक प्रभाव
डिहायड्रेशनच्या कमी पातळीमुळे मूड, एनर्जी लेव्हल आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता हे प्रभावित होऊ शकते. डिहायड्रेशनमुळे अनेक शारीरिक आणि मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते. यामुळे चिंता, डिप्रेशन (नैराश्य), एकाग्रतेचा अभाव, थकवा, डोकेदुखी आणि मानसिक अस्वस्थता होऊ शकते. याशिवाय मुलांच्या मूडमध्ये किंवा मनःस्थितीतही वारंवार बदल दिसून येतात. शरीरातील हार्मोन्स, रसायने आणि अवयवांवर पाण्याचा परिणाम होतो ज्यामुळे शरीरात बदल जाणवतात.
डिहायड्रेशनची लक्षणे
– त्वचा कोरडी होणे
– तोंड कोरडे पडणे
– चक्कर येणे
– डोळ्यांतून अश्रू न येणे
– डोकेदुखी
– लघवीच्या रंगात बदल होणे
वयानुसार वाढवा पाण्याचे प्रमाण
4 ते 8 वर्षांच्या मुलाने दररोज 6-7 ग्लास पाणी प्यावे. तर, 9 ते 13 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 9-10 ग्लास पिणे आवश्यक आहे. वयानुसार पाण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे.
मुलांना पाणी प्यायची सवय कशी लावावी ?
– पाण्याची चव वाढवणारा पदार्थ घालावा.
– आकर्षक बाटली किंवा कपचा वापर करावा.
– मुलांना पाणी प्यायला सांगताना, आपण स्वत: त्यांच्यासोबत पाणी प्यावे
– मुलांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करावे
– ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल अशी फळं मुलांना खायला द्यावीत.
मुलाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी त्यांनी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. डिहायड्रेशनचा परिणाम मुलाच्या मेंदूवर होऊ शकतो, त्यामुळे मुलांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करा.