Diabetes : तुम्हालाही आहे मधुमेहाचा त्रास? तर काळजी घ्या, अन्यथा गमवावा लागू शकतो एखादा अवयव

| Updated on: Aug 27, 2022 | 11:21 AM

डायबिटीस म्हणजेच मधुमेह हा एक जुनाट आजार आहे. गेल्या काही वर्षांत तरुणांमध्येही मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. NHS ने दिलेल्या माहितीनुसार, मधुमेहाच्या रुग्णांमध्ये शरीराच्या  एखादा भागास इजा झाल्यास तो कापावा लागण्याचा धोका 15 टक्के अधिक असतो.

Diabetes : तुम्हालाही आहे मधुमेहाचा त्रास? तर काळजी घ्या, अन्यथा गमवावा लागू शकतो एखादा अवयव
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: Social Media
Follow us on

जगभरातील लाखो लोक मधुमेहाच्या (Diabetes) समस्येचा सामना करत आहेत. शरीरातील ग्लूकोजची पातळी प्रमाणाबाहेर वाढल्यास मधुमेहाचा सामना करावा लागतो. ते बॅलन्स करण्यासाठी इन्सुलिनची खूप मदत होते. इन्सुलिन हे स्वादुपिंडातून बाहेर पडणारे संप्रेरक आहे, जे रक्तातील ग्लूकोजची (Glucose) पातळी सांभळते आणि नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. मधुमेह हा दोन प्रकारचा असतो, टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह. टाइप 1 मधुमेहात स्वादुपिंडातून इन्सुलिनची थोडीही निर्मिती होत नाही. तर टाइप 2 मधुमेहामध्ये स्वादुपिंडातून इन्सुलिनची निर्मिती अगदी थोड्या प्रमाणात होते. अशा वेळेस आपण आपल्या शरीरातील ग्लूकोजची पातळी टिकवून (blood sugar level) ठेवणे महत्वाचे ठरते. मधुमेहाकडे दुर्लक्ष करणे आपल्या आरोग्यासाठी फार धोकदायक ठरू शकते. त्यामुळे कधीकधी शरीराचा एखादा अवयव कापावा लागण्याची देखील वेळ येईल शकते.

अहवाल काय सांगतो?

नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या सांगण्यानुसार (NHS), मधुमेहाच्या रुग्णांमध्ये शरीराचा एखादा भाग कापावा लागण्याचा (amputation) धोका 15 टक्के अधिक असतो. कारण त्यांच्या शरीराच्या टिश्यूज डॅमेज झाल्यास पूर्वीप्रमाणे त्यांची दुरुस्ती करू शकत नाही. टाइप 2 मधुमेह झालेल्यांच्या तुलनेत टाइप 1 मधुमेह झालेल्या रुग्णांना याचा धोका अधिक संभावतो. तरुणांमध्ये मधुमेहामुळे शरीराचा एखादा भाग कापावा लागल्याच्या घटना गेल्या 10 वर्षात वेगाने वाढताना दिसत आहेत. ब्रिटनमधील आकड्यांनुसार, गेल्या वर्षी मधुमेहामुळे 29 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या 17 तरुणांना त्यांचे हात अथवा पाय गमवावे लागले. तर 2011-12 साली 6 आणि 2009-10 साली फक्त 2 लोकांना त्यांचे हात-पाय गमवावे लागले.

योग्यवेळेत उपचार करणे गरजेचे

आम्ही तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत जिला 14 व्या वर्षी टाइप 1 मधुमेह झाल्याचे निदान झाले आणि 35 व्या वर्षी तिला तिचे दोन्ही पाय गमवावे लागले. त्या महिलेचे नाव आहे ल्यूसी नजीर. ‘ मी स्वत:कडे नीट लक्ष दिले नाही तर अशी वेळ येऊ शकते, याची कल्पना मला कोणी आधीच दिली असती तर बरं झालं असतं ‘ अशी खंत ल्यूसीने व्यक्त केली. 2016 साली उजव्या पायाचा घोटा फ्रॅक्चर झाल्यानंतर ल्यूसीला तो पाय गमवावा लागला. तर 2019 साली तिला डावा पायही गमवावा लागला. असा दुर्दैवी प्रकार इतर कोणासोबतही घडू नये यासाठी यांसदर्भात तरुणांनी वेळेतच तज्ज्ञांचा अथवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतला पाहिजे, असे ल्यूसीने नमूद केले आहे.

हे सुद्धा वाचा

मधुमेहामुळे पायाचे कसे होते नुकसान ?

मधुमेह दोन परिस्थितींशी संबंधित आहे- पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) आणि डायबेटिक न्यूरोपथी. या दोन्ही समस्यांमुळे पाय कापण्याची वेळ येऊ शकते. पेरीफेरल आर्टरी डिसीजमध्ये धमन्या संकुचित होऊ लागतात, ज्यामुळे पायांपर्यंत होणारा रक्तप्रवाह कमी-जास्त होतो किंवा होतच नाही. ज्यामुळं पायांना संसर्ग होऊ शकतो. रक्तप्रवाह नीट न झाल्यास पायाला आलेले फोड किंवा संसर्ग बरा होण्यास जास्त वेळ लागू शकतो. तर डायबेटिक न्यूरोपथीमध्ये मज्जातंतूंचे नुकसान होते. शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने शरीरातील नर्व्ह्ज आणि रक्तपेशीं खराब होतात. जेव्हा तुमच्या नर्व्ह्ज डॅमेज होतो, तेव्हा तुमच्या पायांना वेदना, थंड, गरम अथवा तीक्ष्ण अशा कोणत्याही गोष्टींचा स्पर्श झाल्याचे जाणवत नाही. तसेच त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. जर तुमच्या पायांना न्यूरोपथीचा सामना करावा लागला, तर फार कठीण परिस्थिती होऊ शकते. पायांना काही लागले, तरी त्याची जाणीव होत नाही. संसर्ग झाल्यावरच त्याबद्दल कळते. त्यामुळे तुम्हाला गँगरीन सारख्या भयानक संसर्गाचाही सामना करावा लागू शकतो. तुमच्या शरीरातील टिश्यूज मृत झाल्यानंतर गँगरीन होते. काही गंभीर प्रकरणांमध्ये डॉक्टर गँगरीनचा प्रभाव झालेला भाग कापतात.

कसा करावा या समस्येपासून बचाव ?

जर तुम्हाला मधुमेह असेल तर पायाची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पाय कापावा लागण्याचा धोका कमी होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घेतली तर पाय कापावा लागण्याची वेळ कधीच येणार नाही. जर तुम्हाला मधुमेह झाला असेल ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा. पायांना फोड येणे, कापणे, भेगा पडणे, एखादी जखम, पाय लालसर होणे, पांढरे डाग, गाठ असे एखादे लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.