नवी दिल्ली – बहुतांश लोकांची सकाळ ही चहाशिवाय अधुरी असते. काहींना दुधाचा चहा आवडतो तर काही लोक लेमन टी किंवा ब्लॅक टी पिणे पसंत करतात. मात्र काही व्यक्तींना ग्रीन टी (green tea) प्यायचीही आवड असते. विशेषत: तुम्हाला वजन कमी करायचे (weight loss) असेल तर ग्रीन टी पिणे फायदेशीर समजले जाते. त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. मात्र प्रत्येक गोष्ट एका ठराविक प्रमाणात केली तर ती योग्य ठरते, अन्यथा त्यामुळे नुकसान होण्याचीच शक्यता जास्त असते. ही बाब ग्रीन टी साठीही लागू होते. दररोज अथवा गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी प्यायल्यास त्याचे दुष्परिणाम (side effects of green tea)होतात, अशी माहिती समोर आली आहे. ग्रीन टीमुळे आपले यकृत म्हणजेच लिव्हरचेही नुकसान होऊ शकते. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ग्रीन टीमुळे होऊ शकते लिव्हरचे नुकसान?
ग्रीन टीमध्ये अनेक पोषक तत्वं, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यासारखे आरोग्याचे अनेक फायदे मिळतात. ग्रीन टीचे सेवन करणे हे हृदयाचे आरोग्य आणि मधुमेह इत्यादींसाठी देखील फायदेशीर मानले गेले आहे. मात्र, एका अभ्यासानुसार, दररोज ग्रीन टी पिणे किंवा त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे हे आपल्या लिव्हरसाठी (यकृच) हानिकारक असू शकते. या अभ्यासानुसार, ग्रीन टीमध्ये एपिगॅलोकॅटेचिन गॅलेट (Epigallocatechin Gallate) नावाचे एक कॅटेचिन आहे, जे लिव्हरसाठी हानिकारक मानले जाते. म्हणूनच दररोज ग्रीन टी पिणे किंवा ग्रीन टीचे अतिसेवन करणे यामुळे लिव्हरच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तसेच लिव्हरशी संबंधित समस्या वाढू शकतात अथवा लिव्हर डॅमेजही होऊ शकते. मात्र यासंदर्भात अद्याप आणखी संशोधन सुरू आहे.
ग्रीन टी रोज किंवा त्याहून अधिक प्यायल्याने यकृताचे कार्य करणे कठीण होऊ शकते.
जास्त ग्रीन टी प्यायल्याने होणारे नुकसान :
जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने आपल्या आरोग्याचे इतरही नुकसान होऊ शकते. ग्रीन टीच्या अतिसेवनामुळे ॲसिडीटी, मिनरल्सची कमतरता निर्माण होणे, डिहायड्रेशन, कॅफेन ओव्हरडोस, अशक्तपणा, पोटासंदर्भातील समस्या उद्भवणे, असा त्रास होऊ शकतो. म्हणूनच, जर तुम्हीही ग्रीन टीचे शौकीन असेल तरीही एका ठराविक प्रमाणातच ग्रीन टीचे सेवन करा.