नवी दिल्ली – आजच्या काळात डेस्क जॉब (desk job) करणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. बरीचशी कामं ही डिजीटल पद्धतीने होत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना तासनातस खुर्चीवर बसून काम करावं लागतं. मात्र यामुळे आरोग्याचे नुकसान (effect on health)होऊ शकतं. बराच काळ बसून अथवा बैठं काम केल्याने आपल्या शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात, मात्र त्यामध्ये सर्वात जास्त धोका हा हृदयविकाराचा (risk of heart disease) असतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार कामादरम्यान ब्रेक न घेता तासनतास बसून काम केल्याने हृदयाशी संबंधित आजार होण्याची अधिक शक्यता असते.
बराच काळ बसून काम केल्याने लोकांना हृदयासंबंधित आजार होऊ शकतात. अनेक अभ्यासांमधून अशी माहिती समोर आली आहे की अनेक तास बसून काम केले आणि मधे ब्रेक घेतला नाही तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 40 टक्क्यांपर्यंत वाढते, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी पहिले कारण म्हणजे लठ्ठपणा. जे लोक जास्तीत जास्त वेळ बसून राहतात किंवा बसून काम करतात त्यांना लठ्ठपणाचा त्रास होण्याची शक्यता सर्वाधिक असते. बराच काळ बसून राहिल्याने त्यांच्या शरीरात लिप्रोप्रोटीन लायपेज कमी प्रमाणात निघते, त्यामुळे शरीरात विविध जागी चरबी जमा होऊ लागते. जे लोक डेस्क जॉब करतात, त्यांच्या पोटाच्या आसपासच्या भागातील फॅट खूप वाढल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत लोकांना लठ्ठपणाचा त्रास सहन करावा लागतो. हाच लठ्ठपणा हृदयरोगाचे प्रमुख कारणही ठरू शकतो.
मधुमेहाचाही होऊ शकतो त्रास
वरिष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, काही संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की एकाच जागी तासनतास बसून राहिल्याने मधुमेहाचा धोकाही वाढतो, मात्र त्यामागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण असे म्हटले जाते की बसून राहिल्याने इन्सुलिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. काही लोकांना हाडं आणि स्नायूंमध्ये सतत वेदना होण्याचा त्रासही सगहन करावा लागतो. त्यांना गुडघे, कोपर आणि मान या भागांमध्ये जास्त वेदना होतात. महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये हा त्रास अधिक दिसून येतो.
असा करा बचाव
– काम करताना दर अर्ध्या तासाने काही मिनिटांसाठी ब्रेक घ्या आणि थोडी हालचाल करा अथवा फिरा.
– कामादरम्यान दर दोन तासांनी शरीर हलके-हलके स्ट्रेच करावे.
– एका तासापेक्षा अधिक काळ एकाच पोश्चर अथवा एकाच स्थितीत बसू नये.
– काम करताना शरीराचे पोश्चर नीट व योग्य ठेवावे.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)