नवी दिल्ली : ज्या स्त्रिया पहिल्यांदाच स्त्रीरोगतज्ज्ञांना (Gynecologist) भेटतात, त्यांना अशा वेळी संकोच वाटू शकतो. डॉक्टर त्यांच्या तब्येतीशी संबंधित कोणते प्रश्न विचारतील हे त्यांना माहीत नाही, असा विचार करून महिला लाजतात (women feel shy). पण तुमच्या या संकोचामुळे कधीकधी स्त्रीरोगतज्ज्ञांना समस्येच्या मुळाशी जाण्यात अडचण निर्माण होऊ शकते. स्त्रीरोगतज्ञ अथवा गायनॅकॉलॉजिस्ट या कोणत्याही स्त्रीची तिच्या प्रजनन आरोग्याशी संबंधित असलेली समस्या शोधण्यापासून ते तिच्या संपूर्ण आरोग्याची काळजी (health care) घेण्यात मदत करू शकतात. म्हणूनच, स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी, आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांना पहिल्यांदा भेटताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या कोणत्या हे सविस्तर जाणून घेऊया.
स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जाण्यापूर्वी या गोष्टीही जाणून घ्याव्यात –
ग्रूमिंगचे टेन्शन घेऊ नका
पहिल्यांदा स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाण्यापूर्वी, प्युबिक हेअर साफ न केल्यामुळे जर तुम्हाला ताण येत असेल तर असे टेन्शन घेणे अगदी अनावश्यक आहे. या गोष्टीचा एवढा ताण घ्यायची काहीच गरज नाही. कारण स्त्रीरोगतज्ज्ञांना फक्त तुमच्या आजारासंबंधी जाणून घ्यायचे असते, त्यांचा तेवढाच संबंध असतो. पण जेव्हा वैयक्तिक स्वच्छतेचा विचार करायची वेळ येते, तेव्हा स्त्रियांनी त्यांचे प्युबिक हेअर स्वच्छ केले पाहिजेत, असे म्हटले जाते. पण हा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमचे केस स्वच्छ केले नसतील तरी काही हरकत नाही कारण, स्त्रीरोगतज्ज्ञांसाठी ही सामान्य बाब आहे.
तुमचा मुद्दा स्पष्टपणे मांडा
तुम्ही जरी पहिल्यांदाच स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जात असाल तरी त्याही एक डॉक्टरच आहेत हे समजून घ्या. त्यामुळे त्यांच्याकडे गेल्यावर स्पष्टपणे संवाद साधा. तुम्हाला नेमका काय त्रास होतोय, काय समस्या आहे, हे त्यांना व्यवस्थित सांगा, उगाचच लाजू नका. किंवा डॉक्टरांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नका. डॉक्टर तुम्हाला जे काही प्रश्न विचारतील त्यासाठी तयार रहा आणि मुद्देसूद उत्तरं द्या. तुम्ही स्त्रीरोगतज्ज्ञांपासून एखादी गोष्टी लपवली किंवा लाजेखातर ती सांगितली नाही तर त्यात तुमचेच नुकसान होईल. त्या तुमच्या समस्येचे नीट निराकरण करू शकणार नाहीत व तुमचा त्रास आणखीनच वाढू शकेल. त्यामुळे डॉक्टरांशी बोलताना घाबरू नका, मनात जे असेल, जो त्रास होत असेल तो स्पष्टपणे, न लाजता सांगा.
मासिक पाळी ट्रॅक करा
जर तुम्ही तुमच्या मासिक पाळीचा कालावधी ट्रॅक केला असेल तर त्यामुळे डॉक्टरांना तुमच्या समस्येचे निदान करणे आणखी सोपे जाईल. हे काम सोपे करण्यासाठी तुम्ही पीरिएट ट्रॅकिंग ॲप्सचा वापर करू शकता. तेथे दर महिन्याची माहिती सविस्तर मिळू शकेल.