शरीर निरोगी (healthy body) ठेवण्यासाठी आणि आजारांचा धोका कमी करण्यासाठी आपल्या आहाराद्वारे पोषक द्रव्ये मिळवणे अत्यंत आवश्यक मानले जाते. अवयव निरोगी ठेवण्यात आणि अनेक प्रकारच्या गंभीर आजारांचा धोका कमी करण्यात व्हिटॅमिन्सची (जीवनसत्त्व) (vitamins) विशेष भूमिका मानली जाते. अन्नामध्ये पोषक तत्वांचा अभाव असेल किंवा काही आजार झाला असेल, तर शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता निर्माण होऊ शकते, अशावेळी डॉक्टर त्या व्हिटॅमिन्सच्या सप्लीमेंट्सचे ( vitamin supplements) सेवन करण्याची शिफारस करतात. मात्र डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी ती म्हणजे, शरीरातील व्हिटॅमिन्सची (जीवनसत्त्व) कमतरता जशी हानिकारक असते, तसेच त्याचे अधिक प्रमाणात सेवन केल्यानेही आरोग्याच्या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
काही अभ्यासातून अशी माहिती समोर आली आहे की, काही व्हिटॅमिन्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवून गंभीर आजार आणि संसर्ग होण्याच्या जोखमीपासून आपले संरक्षण करू शकतात. याच कारणामुळे कोरोना संसर्गाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सर्व लोकांना व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन – डीचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देत होते.
मात्र कमी वेळात अधिक फायदा मिळवण्यासाठी जर तुम्हीही जास्त व्हिटॅमिन्सचं सेवन करत असाल तर त्याचे अनेक दुष्परिणामही होऊ शकतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटॅमिन सप्लीमेंट न घेण्याचा सल्ला दिला जातो. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
व्हिटॅमिन – सी चा अतिरेक :
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते स्कर्व्ही सारख्या रोगापासून बचाव करण्यापर्यंत, व्हिटॅमिन – सी च्या सेवनावर भर दिला जातो. आंबट फळं ही या व्हिटॅमिनचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. प्रौढांसाठी दररोज 2,000 मिलीग्रामच्या प्रमाणात या व्हिटॅमिनचे सेवन करणे सुरक्षित मानले जाते,त्या, मात्र त्याच्या अतिरिक्त सेवनामुळे आरोग्यास अनेक प्रकारचे धोके उद्भवू शकतात. व्हिटॅमिन-सीच्या वाढत्या प्रमाणामुळे अतिसार आणि मळमळ होणे, ही सर्वात सामान्य समस्या आहे. याशिवाय व्हिटॅमिन-सीमुळे शरीरातील ऑक्सलेटही वाढते, ज्यामुळे किडनीमध्ये मूतखडे तयार होण्याचा धोका असतो.
व्हिटॅमिन-डीच्या अतिरेकामुळे होणारे नुकसान :
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, हाडं बळकट करणे यासाठी व्हिटॅमिन-डी हे सर्वात प्रभावी मानले जाते. व्हिटॅमिन – डी याचे शिफारस केलेले प्रमाण 400-800 आययू/दिवस इतके आहे. मात्र यापेक्षा अधिक प्रमाणात हे व्हिटॅमिन घेतल्यास अनेक त्रास होऊ शकतात. व्हिटॅमिन डीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण (हायपरक्लेसीमिया) वाढते, ज्यामुळे मळमळ आणि उलट्या होणे, अशक्तपणा येणे आणि वारंवार लघवी होणे, असा त्रास होऊ शकतो. तसेच व्हिटॅमिन-डीच्या अतिरेकामुळे किडनी स्टोनचाही धोका असतो.
व्हिटॅमिन-ईचा अतिरेक :
व्हिटॅमन-ई हे त्वचा आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते. अनेक रोग आणि संसर्ग याच्याविरूद्ध लढा देण्यासाठी शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील व्हिटॅमिन-ई ची आवश्यकता असते. मात्र याच्या शरीरातील अतिरिक्त प्रमाणामुळे काही परिस्थितीमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो. यामुळे इंट्राक्रॅनिल रक्तस्त्राव होण्याचा धोका देखील वाढतो. त्यामुळे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्हिटॅमिन सप्लीमेंट्सचे सेवन करावे.
व्हिटॅमिन- ए च्या अतिरेकामुळे होणारे नुकसान :
व्हिटॅमिन-ए मुळे, आपले डोळे आणि त्वचेचे संरक्षण तर होतेच, पण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे व्हिटॅमिन सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या व्हिटॅमिनचे अतिरिक्त प्रमाण हे यकृताच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. व्हिटॅमिन-ए सप्लीमेंट्सचे अतिरिक्त सेवन केल्यास तीव्र डोकेदुखी, अंधुक दृष्टी, मळमळ, चक्कर येणे, स्नायू दुखणे असा त्रास होऊ शकतो. तर काही लोकांमध्ये समन्वयाची समस्या देखील उद्भवू शकते.