नवी दिल्ली | 25 जुलै 2023 : आजकाल भारतातील बहुतांश महिलांना 35 वर्षांचा टप्पा ओलांडताच कमकुवत हाडांच्या ( weak bones) समस्येचा सामना करावा लागतो. एक काळ असा होता की म्हातरपणी सांधेदुखी किंवा हाडांशी संबंधित समस्या उद्भवत असतं. पण आताची परिस्थिती खूपच बदलली आहे. महिला असोत किंवा पुरुष, आजकाल प्रत्येकाला वयाच्या ३० व्या वर्षांनंतर आरोग्याच्या अनेक समस्या सहन कराव्या लागतात. विशेषत: 35 व्या वर्षांनंतर महिलांना हाडं दुखणे किंवा हाडं कमकुवत होणं यासारख्या दुखण्यांना सामोरं जावं लागतं.
बिझी लाइफ आणि खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी, पौष्टिक अन्नाचा अभाव यामुळे हा त्रास होऊ शकतो. 35 व्या वर्षानंतरही महिला फिट अँड फाइन कशा राहू शकतात, ते जाणून घेऊया.
कॅल्शिअम युक्त पदार्थ
आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता असेल तर त्यामुळे हाडं झपाट्याने कमकुवत होऊ शकतात. ती हाडं मजबूत करण्यासाठी अथवा ती निरोगी रहावीत यासाठी ज्यामध्ये कॅल्शिअम जास्त असेल अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे. दूध, चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांनी कॅल्शिअमच्या कमतरतेवर मात करता येते.
पालकाचे पदार्थ
पालक हा आयर्न अर्थात लोहाचा उत्तम स्त्रोत मानला जातो. त्यामुळे हाडांसाठीही पावकाचे सेवन फायदेशीर असते. नियमितपणे पालकाचे सेवन केल्यास शरीरातील रक्ताची कमतरताही दूर होते आणि त्याचा फायदा हाडांना होतो. पालकाची भाजी, सूप, पराठे किंवा ज्यूस या स्वरूपात तुम्ही पालकाचे सेवन करू शकता.
आलू बुखार
आलू बुखार हे असे फळ आहे जे खाल्ल्याने शरीरातील ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. हा हाडांशी संबंधित आजार आहे जो खूप त्रास देऊ शकतो. आलू बुखार थेट खाणे चांगले असते अथवा तुम्ही त्याचा रसही पिऊ शकता.
दही ठरते फायदेशीर
दही हे चविष्ट तर असतेच पण हेल्दीही असते. दिवसभरात एकदा तरी दह्याचे सेवन केले पाहिजे. त्यामध्ये हाडांसाठी महत्वाचे असलेले कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते. तसेच पोठासाठीही दह्याचे सेवन उत्तम असते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)