ओहीओ : लहान मुलांवर खूपच लक्ष ठेवणे गरजेचे असते. कधी काय करतील याचा काही नेम नाही. असाच एक भयंकर प्रकार अमेरिकेतील ओहीओ येथे घडला आहे. येथील एका चार वर्षांच्या चिमुरड्याने एकाच बैठकीत चाळीस शुगर फ्री च्युईंग गमचे पाकीट संपवित ते च्युईंग गम थेट गिळल्याने त्याच्या आई-वडीलांची चांगलीच धावपळ उडाली. अखेर डॉक्टरांना या मुलाच्या घशातून नळी घालून हे च्युईंग गम एक – एक करुन काढावे लागले.
अमेरिकेतील ओहीओ येथील एका चार वर्षीय बालकाने एकाच वेळी चाळीस च्युईंग गम गिळल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर या मुला अतिसार आणि स्नायूंना पेटके येण्याचा त्रास सुरु झाला. या मुलाला क्लीव्हलॅंड क्लिनिक येथे नेण्यात आले. क्लीव्हलँड क्लिनिकमधील डॉ. चिझिट यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने या मुलाचा सीटी स्कॅन काढला. तेव्हा त्याच्या पोटात च्यईंग गमचा थर असल्याचे दिसून आले. त्यानंतर या मुलाच्या घशातून च्युईंग गमचा गठ्ठा खेचून बाहेर काढावा लागला. या मुलाचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. घशातून च्युईंगम काढल्याने त्याचा घसा काही काळ दुखू लागला होता. परंतू त्याव्यतिरिक्त त्याच्यावर या प्रक्रियेचा दीर्घकालीन परिणाम झाला नाही.
जेईएम रिपोर्ट्स या पब्लिकेशनमध्ये ही केस प्रसिद्ध झाली आहे. या मुलाला पोटात दुखत असल्याने आणि डायरीया झाल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्याने काही तरी बाह्य घटक गिळल्याने त्याला त्रास सुरू झाल्याचे सांगण्यात आले होते. त्याच्या आईने त्याने शुगर फ्री च्युईंग गमचं अख्खे पाकिट संपविल्याचे सांगितले. तिने तिच्या मुलाला तिच्या घराजवळील क्लिनिकमध्ये नेले. तेथून त्याचे पोट दुखत असल्याने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर त्याच्या कळा वाढल्याने त्याला इमर्जन्सी कक्षात उपचार करण्यात आले.
सीटी स्कॅनमध्ये त्याच्या पोटात बाह्य पदार्थ अडकल्याचे दिसून त्याने पोटाचा 25 टक्के भाग व्यापल्याचे दिसले. डॉक्टरांनी या मुलावर उपचार कसे करावेत यावर चर्चा केली. अखेर अन्ननलिकेतून हे च्युईंग गम अनेक प्रयत्न करून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांनी पोकळ धातूची नळी घशातून टाकत च्युईंग गमचे तुकडे बाहेर काढले. अनेक प्रयत्न करीत नळीद्वारे हे च्युईंग गम बाहेर काढले गेले, संपूर्ण ऑपरेशन दरम्यान मुलगा शांत राहील्याने सोपे गेले.