मुंबई, फळे आणि भाज्या हे नेहमीच आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Healthy Food) मानले गेले आहेत. वनस्पतींवर आधारित आहारामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आढळतात, ज्याचा एकूणच आरोग्यासाठी खूप फायदा होतो. अभ्यासानुसार, वनस्पती-आधारित आहाराचे फायदे काय आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेऊया. वनस्पतींवर आधारित पदार्थ शरीरासाठी नेहमीच चांगले मानले गेले आहेत. फळे, भाज्या, बीन्स, शेंगा आणि कडधान्य यांसारख्या घटकांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, फायटोन्यूट्रिएंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.
अनेक अभ्यासांनी असा दावा केला आहे की वनस्पती-आधारित खाद्यपदार्थांचा जास्त वापर केल्याने जुनाट आजारांचा धोका कमी होतो.
यासोबतच टाईप 2 मधुमेह, यकृत संबंधित आजार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, पचनाशी संबंधित समस्या, डोळ्यांचे आजार आणि अगदी नैराश्य आणि चिंता टाळण्यातही मदत होते.
अलीकडेच 5 नवीन अभ्यासातून असे दिसून आले आहे की, वनस्पती-आधारित आहार घेतल्यास मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
चला तर मग जाणून घेऊया वनस्पतीवर आधारित सर्वोत्तम आहार खाण्याचे कोणते फायदे आहेत आणि कोणते आजार टाळता येतात.
निरोगी शरीर आणि चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार मिळणे आवश्यक आहे. शरीराला पोषक आहार देण्यासाठी फळे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक समाविष्ट असतात. सुपर फूड म्हणून ओळखले जाणारे एवोकॅडो असेच एक फळ आहे. जगभरातील लोकप्रिय फळांमध्ये एवोकॅडोचा समावेश केला जातो.
एवोकॅडोमध्ये कॅलरीज जास्त असतात ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे ते त्याचे सेवन टाळू शकतात, परंतु अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये जुलैमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, दिवसातून एक एवोकॅडो खाल्ल्याने वजन वाढत नाही. खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या फळाचा फायदा होतो.
जेव्हा आरोग्यदायी आहाराचा विचार केला जातो तेव्हा आहारतज्ज्ञ हंगामी फळे खाण्याचा सल्ला देतात. ब्रिटनमधील ॲस्टन युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ हेल्थ अँड लाइफ सायन्सेसने केलेल्या अभ्यासानुसार, मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांना फळे आणि भाज्या खाल्ल्याने खूप फायदा होतो.
संशोधनानुसार, जे लोकं भूक लागल्यावर चिप्स, चिवडा किंवा पाकिटबंद इतर पदार्थ खातात त्यांची मानसिक स्थिती कमकुवत असते, तर जे लोक फळे आणि भाज्यांचे सेवन करतात त्यांची मानसिक स्थिती खूप चांगली राहते.
यासोबतच अशा लोकांमध्ये चिंता, नैराश्याची लक्षणेही कमी असतात. फळे आणि भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि मेंदूच्या कार्याला चालना देणारे आवश्यक पोषक असतात. फळे कच्ची खातात त्यामुळे त्यांचे फायदे जास्त असतात.
हंगामी फळे खाल्याने मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.