मुंबई : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे कामाला जाताना, कुठे बाहेर जाताना किंवा शाळा, कॉलेजला जाताना पावसामुळे लोक भिजतातच. त्यामुळे बहुतेक लोक आजारी पडतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. तसंच पावसामुळे विषाणू आणि जीवाणूंच्या संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे आरोग्य, स्वच्छतेसोबतच अन्नाचीही काळजी घेतली पाहीजे. महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर असतात त्याच गोष्टी पावसाळ्यात आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. यामध्ये दुधाचा समावेश असून पावसाळ्यात दूध कमी प्रमाणात पिलं पाहिजे. तर आता आपण याची कारण जाणून घेणार आहोत.
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ टाळावेत. कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या गोष्टींमध्ये जंतू वाढू शकतात. त्यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. तसंच जर एखाद्याची पचनक्रिया कमजोर असेल तर या दिवसांमध्ये दही खाऊ नका, कारण यामुळे आणखी समस्या वाढतात.
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला दररोज दूध प्यायची सवय असेल तर तुम्ही पावसाळ्यात दुधात हळद मिक्स करून ते पिऊ शकता. त्यामुळे आपली ताकदही वाढते आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. सोबतच आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
डॉक्टर नेहमी आपल्याला हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. पण पावसाळ्यात ते आपल्याला या भाज्या न खाण्याचा सल्ला देतात. कारण या दिवसांमध्ये विषाणू, जिवाणू मोठ्या प्रमाणात आढळतात. तसंच पालेभाज्यांमध्येही आळ्या आढळतात, तसंच ती पालेभाजी ज्या मातीत पिकवली जाते ती सध्याच्या काळात खूप घाण झाली आहे त्यामुळे हिरव्या भाज्या खाणं टाळावं. जर तुम्हाला पालेभाज्या खायच्याच असतील तर त्या स्वच्छ धुवून नीट शिजवून खा.
तसंच पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम भजी, वडापाव असे पदार्थ खायची इच्छा होतेच आणि बहुतेक लोक या गरमागरम पदार्थांचा आस्वाद पावसाळ्यात आवर्जून घेतातच. पण हे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये कारण यामुळे गॅस, अपचन सारख्या समस्या निर्माण होतात.