आपल्याला उचकी लागली तर कुणी तरी आपली आठवण काढत असेल असं आपण म्हणतो. पण तसं काही होत नसतं. तुमची आठवण काढण्याचा आणि उचकीचा काहीच संबंध नसतो. उचकी लागण्यामागे शरीर विज्ञान आहे. अचानक उचकी लागते. काही लोकांची उचकी पटकन थांबते. तर काही लोकांची उचकी बऱ्याच वेळानंतर थांबते. कितीही पाणी प्यायलं आणि कोरडी भाकरी खाल्ली तरी उचकी काही थांबत नाही.
उचकी लागण्याचं कारण म्हणजे तिखट पदार्थ, मद्यपान, कार्बोनेटेड शीतपेय किंवा खूप गरम किंवा खूप थंड पदार्थ खाल्ले तरी उचकी लागते. त्यामुळे जर कधी उचकी आली तर खाली दिलेल्या घरगुती उपायांचा वापर करून तिला दोन मिनिटात थांबवू शकता.
थंड किंवा कोमट पाणी प्या : उचकी आली की लगेच थंड किंवा कोमट पाणी प्या. या उपायाने त्वरित उचकी थांबू शकते.
मान चोळा: उचकी आली की मानेच्या मागील भागावर हळूवार मसाज करा. हा उपाय प्रभावी ठरतो.
श्वास रोखून धरा: उचकी आली की काही सेकंदासाठी श्वास रोखून ठेवा. या पद्धतीमुळे उचकी थांबायला मदत होऊ शकते.
दुर्लक्ष करा : उचकी आल्यावर त्याकडे दुर्लक्ष करा. दुसरीकडे लक्ष केंद्रीत करा. उचकी थांबते.
नाक पकडून श्वास सोडा : नाक घट्ट पकडून श्वास सोडा. यामुळे उचकी थांबते, कारण श्वासातून बाहेर जाणारा कार्बन डायऑक्साईड उचकी थांबवतो.
अंगठ्याने मसाज करा : बोटाच्या अंगठ्याने हाताला मसाज केल्याने उचकी थांबू शकते.
तोंडातून जीभ बाहेर काढा : पाणी पिऊनही उचकी थांबत नसेल तर जीभ बाहेर काढून थोड्या वेळासाठी तशीच ठेवा. यामुळे गळ्यातील स्नायूंचा ताण कमी होतो आणि उचकी थांबते.
साखरेचा वापर : एक चमचा साखर घेऊन ती चांगली चोळून, अर्ध्या ग्लास पाण्यात प्या. त्याने उचकी लगेच थांबते.
काही मिनिटं बसून राहा : उचकी आले की अचानक बसून, पाय छातीच्या वर घ्या. यामुळे श्वासातील स्नायूंचे ताण कमी होतात आणि उचकी थांबते.
पेपर्स बॅगचा वापर : घरात पेपर बॅग असेल तर, त्यातून 10 वेळा श्वास घेतल्याने उचकी थांबू शकते.
(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)