Health News : मधुमेहाचा त्रास आजकाल बहुतेक लोकांना असतोच. त्यामध्ये फक्त ज्येष्ठांनाच नाही तर आजच्या तरूणाईला देखील मधुमेहाचा त्रास होताना दिसतोय. मधुमेह हा असा आजार आहे जो मुळापासून नष्ट करता येत नाही. पण तुम्ही तुमच्या जीवनशैलीत आणि दररोजच्या आहारात बदल केले तर मधुमेहावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, कॉफीचं सेवन केल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका टाळण्यास मदत होते.
संशोधकांनी केलेल्या अभ्यासात टाइप 2 मधुमेहाशी संबंधित बायोमार्कर्सच्या पातळीत बदल पाहिले. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार, दररोज 1 कप कॉफी प्यायल्याने टाईप 2 मधुमेहाचा धोका आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता 4 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होते.
कॉफी प्यायल्याने इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी होते, त्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये, स्वादुपिंडाने तयार केलेले इन्सुलिन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकत नाही. पण कॉफीमधील पॉलिफेनॉल संयुगे इन्सुलिनचा दाह सुधारतात, ज्यामुळे प्रणालीगत सूज कमी होते.
कॉफीचा परिणाम धूम्रपान करणाऱ्या लोकांवर कमी प्रमाणात होतो, असं संशोधकांना संशोधनात आढळून आलं आहे. त्यांनी धूम्रपान करणाऱ्या, धूम्रपान न करणाऱ्या आणि कधीही धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये मधुमेहाच्या जोखमीवर कॉफीच्या परिणामाची तुलना केली. त्यावेळी असं आढळून आले की ज्यांनी कधीही धूम्रपान केले नाही त्यांच्यावर कॉफीचा सकारात्मक परिणाम होतो.