Health News : सध्याच्या काळात लोक धावपळीत जगणं जगताना दिसतात. कामामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत असते. विशेष म्हणजे शारीरिक मेहनतीच्या कामात लोकांना त्यांच्या पायांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. धावपळीच्या जगात लोकांना पायांची मदत होतेच, पण याच पायांकडे लोक कामाच्या नादात लक्ष द्यायचं विसरून जातात. मग पायाला धूळ लागणे, सॉक्स जर तुम्ही धुतले नसतील तर त्याची घाण लागणे, बुटांची, चपलांची घाण लागणे तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्यामुळे उन्हात पाय काळे पडणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. तर पायाची घाण किंवा त्याचा काळेपणा दूर करण्यासाठी लोक पेडिक्योरचा वापर करतात, पण आपण आता काही असे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपले पाय स्वच्छ आणि सुंदर दिसतील.
1. हळद आणि बेसन
हळदी ही आरोग्यदायी मानली जाते. तसंच त्वचा आणखी उजळ आणि टवटवीत होण्यासाठी हळदीचा वापर आवर्जून केला जातो. तर आता 2 चमचे बेसन घ्या त्यात 2 चमचे हळद घ्या आणि त्यात थोडं मध मिक्स करा. ही पेस्ट तुमच्या पायावर लावा आणि ती 10 ते 15 मिनिटे तशीच ठेवा. त्यानंतर ती पेस्ट सुकल्यावर तुमचे पाय स्वच्छ धुवून घ्या, मग बघा तुमचे पाय नक्कीच चमकदार आणि स्वच्छ होतील.
2. बेसन आणि दही
एका वाटीत दोन मोठे चमचे बेसन घ्या आणि त्यात दही मिक्स करा सोबतच त्यात एक लिंबाचा रस देखील मिक्स करा. हा लेप तुम्ही तुमच्या पायाला लावा आणि ते अर्धा तास तसंच ठेवा. त्यानंतर तुमचे पाय पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा लेप लावल्यामुळे तुमची पायाची सगळी घाण निघून जाईल.
3. दही आणि ओट्स
एका भांड्यात दही, लिंबाचा रस आणि 4 चमचे ओट्स घ्या आणि ते मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या पायाला लावा आणि हलका मसाज करा. 15 मिनिटे ही पेस्ट तशीच राहुद्या आणि त्यानंतर पाय पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यानंतर पायाला आठवणीने मॉइश्चराइजर लावा. यामुळे तुमचे पाय उजळ दिसतील आणि पायाची सर्व घाण निघून जाईल.
Disclaimer : वरील दिलेली सर्व माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित असून टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही. कोणताही घरगुती उपाय करताना तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.