नवी दिल्ली – एंग्झायटी (Anxiety)ची समस्या हा एक मानसिक रोग आहे, ज्यामुळे संबंधित व्यक्तीला तणाव (stress), नकारात्मक विचार (negative thoughts), हृदयाची गती अचानक वाढणे, अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या व्यक्तीला हा त्रास होत असेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. तुम्हाला जर पुढल्या वर्षी (2023मध्ये) एंग्झायटीच्या समस्येपासून दूर रहायची इच्छा असेल किंवा तुम्हाला सध्या हा त्रास असेल आणि ती कशी हाताळावी असा प्रश्न पडला असेल तर काही उपाय जाणून घ्या. डॉक्टरांनी सांगितलेल्या या उपायांनी तुम्हाला मदत होऊ शकेल.
दीर्घ श्वास घ्या
जेव्हा एखाद्या व्यक्तीला एंग्झायटीचा त्रास होत असेल तेव्हा संबंधित व्यक्ती वेगाने आणि दीर्घ श्वास (Long Breath) घेण्यास सुरुवात करते. अशा परिस्थितीत सर्वप्रथम श्वासावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही 1 ते 4 पर्यंत आकडे मोजावेत आणि दीर्घ श्वास घ्यावा. जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेता तेव्हा तुमच्या हृदयाचे ठोके नियंत्रित होतात. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने हळूहळू तुम्ही एंग्झायटीवर मात करू शकाल.
दिवसभरात 15 मिनिटे योग महत्वाचा
एंग्झायटीची समस्या असते तेव्हा व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात. अशा परिस्थितीत, हे विचार थांबवण्यासाठी, तुम्ही नियमितपणे योग करणे आवश्यक आहे. दिवसभरात किमान 15 मिनिटे तरी योग करावा. त्यामुळे तुमचा मूड चांगला राहील व मनही शांत होईल. जर तुम्हाला योगासने करणे शक्य नसेल तर दिवसभरात 15 मिनिटे चालण्यामुळेही एंग्झायटीच्या समस्येपासून मुक्त होता येऊ शकते.
तुमच्या मनातील विचार लिहून काढा
अती ताण किंवा अती विचार करण्याच्या सवयीमुळे एंग्झायटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ही परिस्थिती टालण्यासाठी तुमच्या डोक्यात येणारे विचार एका कागदावर लिहून काढा. यामुळे तुम्हाला हलकं वाटेल आणि रिलॅक्स होण्यास मदत होईल. तसेच मनात येणारे नकारात्मक विचारही हळूहळू दूर ठेवता येऊ शकतील.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)