हिवाळा ऋतू सुरु झाला असून आता कडाक्याची थंडी सुद्धा पडत आहे. थंडीच्या दिवसात आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. या दरम्यान बहुतेक लोकांना त्वचा कोरडी पडणे आणि पायांच्या टाचांना भेगा पडणे अश्या समस्या उद्भवत असतात. या ऋतूमध्ये आपल्या त्वचेचे सर्वाधिक नुकसान होते. अश्यातच तुमच्या सुद्धा पायांच्या टाचांना भेगा पडताय, त्यामुळे तुमच्या पायांचे सौंदर्य निघून जातंय तेही ऐन लग्नसराईच्या दिवसात तर अश्या वेळी तुम्हाला या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या त्वचेला ओलावा आवश्यक असतो, त्यामुळे चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर वापरा, विशेषत: गुडघे आणि पायाच्या त्वचेसाठी. कारण मॉइश्चरायझरमध्ये असे काही घटक असतात जे त्वचेचे सखोल पोषण करतात. तसेच तुम्ही घरगुती उपाय म्हणून रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईलने टाचांना मसाज करा. या तेलांमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि हायड्रेटिंग गुणधर्म असतात, जे त्वचा मऊ करतात आणि तुम्हाला भेगा पडलेल्या टाचांपासून आराम मिळतो.
भेगा पडलेल्या टाचा तुम्हाला जर खूप दुखत असतील तर अश्या वेळेस तुम्ही गरम पाण्यात थोडे मीठ मिसळून पायांना शेक द्या. हे त्वचा मऊ करण्यास आणि जळजळणाऱ्या टाचांना आराम मिळतो. जर तुमच्या पायांच्या टाचांना खूप खोलवर भेगा पडलेल्या असतील आणि वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन मेडिकेटेड क्रीम वापरा. या क्रीममध्ये सॅलिसिलिक ॲसिड असते, जे त्वचेचा वरचा थर मऊ करते आणि बरे करते. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये आंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर केल्यास त्वचेचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
भेगा पडलेल्या त्वचेवर मृत पेशींचा थर जमा होत असतो त्यामुळे तुम्ही या मृत पेशींचा थर काढण्यासाठी स्क्रबचा वापर करावा. मात्र हे खूप काळजीपूर्वक करावे, जेणेकरून तुमच्या त्वचेला आणखी त्रास होणार नाही. याशिवाय तुम्ही रात्री झोपताना मऊ कॉटन मोजे परिधान केल्याने टाचांमध्ये ओलावा राहतो आणि त्वचा मुलायम होते. तसेच तुम्ही टाचांना खोबरेल तेल किंवा कोणतेही चांगले मॉइश्चरायझर लावून तुम्ही मोजे घालू शकता. याने तुमच्या भेगा पडलेल्या टाचा लवकर बरे होतील.
त्वचा आणि पायांच्या टाचांना भेगा पडण्यापासून रोखण्यासाठी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई समृद्ध आहार घेत रहा. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात गाजर, हिरव्या पालेभाज्या, फळे आणि ड्रायफ्रूट्सचा समावेश करून याचे सेवन करा. हे आपल्या त्वचेला आतून पोषण देईल आणि ती कोरडी होण्यापासून प्रतिबंधित करेल. तसेच हिवाळ्यात घट्ट किंवा कडक शूज घालणे टाळावे. आपल्या पायांना आरामदायक आणि मऊ शूज घाला, जेणेकरून भेगा पडलेल्या टाचांवर दबाव येणार नाही आणि त्वचेचे संरक्षण होईल.
थंडीच्या दिवसात आपल्याला जास्त तहान लागत नाही यासाठी या दिवसांमध्ये कमी पाणी पिले जाते. अशावेळी आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवणं खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त पाणी प्या, कारण यामुळे तुमच्या त्वचेला आतून ओलावा मिळतो आणि ती कोरडी होण्यापासून वाचते. तसेच हिवाळ्यात गरम पाणी टाळावे. कोमट पाण्याचा वापर करा, जेणेकरून त्वचेचा नैसर्गिक ओलावा कायम राहील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)