काय सांगता ? व्यायाम न करता, केवळ शांत झोप घेऊनही वजन होऊ शकते कमी ?

| Updated on: Dec 29, 2022 | 10:52 AM

वजन कमी करण्यासाठी हरएक उपाय करून तुम्ही थकला असाल तर हे लक्षात घ्या की खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्यासह पुरेशा प्रमाणात झोप घेणेही तितकेच महत्वाचे आहे.

काय सांगता ? व्यायाम न करता, केवळ शांत झोप घेऊनही वजन होऊ शकते कमी ?
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – जर तुम्ही लठ्ठपणाच्या (obesity) समस्येमुळे त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याची इच्छा असेल तर पुरेशा प्रमाणात झोप घेणे अत्यंत महत्वाचे ठरते, असे तज्ज्ञ सांगतात. कदाचित तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की झोप आणि वजन कमी करण्याचा (weight loss) काय संबंध ! कारण वजन कमी करायचे म्हटले की जिम, व्यायाम, धावणे किंवा चालणे, अशा गोष्टी आपल्या डोक्यात पहिल्यांदा येतात. तर झोप (good sleep) आणि वजनाचे काय कनेक्शन आहे ते पाहूया.

झोप पूर्ण न झाल्यास कॅलरीज बर्न होत नाहीत

खरंतर जेव्हा आपली झोप पूर्ण होत नाही तेव्हा आपल्या शरीरातील मेटाबॉलिज्म (चयापचय क्रिया) मंदावते. ॲक्टिव मेटाबॉलिज्म वजन कमी करण्यास मदत करते, कारण त्यामुळे कॅलरी बर्न होण्यासही मदत होते. पण जर मेटाबॉलिज्म मंदावले तर कॅलरीज बर्न होण्यात अडचण येते. अशा स्थितीत आपण जे काही खातो ते चरबीच्या रूपात आपल्या शरीरात जमा होते.

हे सुद्धा वाचा

इमोशनल ईटिंगमुळे झोपेचा अभाव ?

झोपेच्या कमतरतेमुळे, आपल्या शरीरात साखर आणि उच्च कार्बोहायड्रेट (अन्न) खाण्याची इच्छा खूप वाढते. इतकंच नव्हे तर काही लोक झोपेच्या कमतरतेमुळे ‘इमोशनल ईटिंग’चेही बळी ठरतात. आणि एकदा का तुम्हाला इमोशनल ईटिंगची सवय लागली तर हे काळानुसार वाढतच जाते. त्यामुळे स्वतःला फक्त एक महिन्याचा वेळ द्या आणि त्या काळात झोपण्यापूर्वी साखरयुक्त उत्पादने, कार्बोहायड्रेट्स आणि कॅफेन यांचा वापर पूर्णपणे बंद करा. त्यासह केवळ एका तासाची अतिरिक्त झोप घेतल्यास केवळ तीन महिन्यांच्या आत तुम्ही तुमचे वजन तुम्हाला अपेक्षित आहे तितके होण्यास मदत होऊ शकेल.

आता तुम्हाला वजन कमी होण्याचा आणि चांगल्या झोपेचा परस्परसंबंध कळला असेल ना? चांगली व शांत झोप घेण्यासाठी काय करावे तेही जाणून घेऊया.

लवकर झोपावे

दररोज 7 ते 9 तासांची झोप घेणे हे तुमचे लक्ष्य असले पाहिजे. वीकेंडलाही त्यात कोणताही बदल करू नये. यासाठी तुम्हाला रात्री उशीरापर्यंत टीव्ही बघणे किंवा मोबाईलवर वेळ घालवणे बंद करावे लागेल. लवकर व शांत झोप लागावी यासाठी हे महत्वाचे ठरते.

रात्री चहा किंवा कॉफीचे सेवन टाळावे

रात्री झोपायला जाण्यापूर्वी चहा , कॉफीचे सेवन अथवा मद्यपान करू नये. या सर्वांमुळे झोपेत अडथळा निर्माण होतो. तसेच झोपण्यापूर्वीही कमीत कमी 2 तास आधी काहीही खाऊ नये. रात्रीच्या जेवणात आणि झोपेदरम्यान अधेमध्ये काहीही खाऊ नये. ते अन्न नीट पचत नाही.

तुमची गादी व उशी आरामदायक असावी

या सर्व टिप्स फॉलो केल्यानंतरही जर तुम्हाला नीट झोप येत नसेल तर तुमचा बिछाना नीट करा. यासाठी तुमची गादी आणि उशी आरामशीर असावी. जास्त जाड आणि कडक गादीमुळे नीट झोप येत नाही. त्यामुळे चांगली झोप हवी असेल तर चांगल्या क्वालिटीची व आरामशीर गादी आणि उशी यांचा वापर करावा.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)