नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून हृदयविकाराच्या (cardiac arrest) धक्कादायक घटना समोर येत आहेत. लग्नाच्या मंडपात काहींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहे, तर काहींचा क्रिकेट खेळताना मृत्यू होत आहे. कोरोना (corona) महामारीनंतर अशा घटनांचे प्रमाण वाढल्याचे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या घटना पाहून प्रश्न उपस्थित होत आहेत की हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचा कोरोनाशी काही संबंध (connection) आहे का? हे जाणून घेण्यासाठी ICMR (Indian council of Medical Research) अभ्यास करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली.
वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणारा मृत्यू आणि कोविड यांच्यातील संबंधांचे मूल्यांकन करण्यासाठी ICMR एक अभ्यास करत आहे. त्याचे परिणाम 2 महिन्यांत समोर येतील.
मनसुख मांडविया एका चॅनेलच्या समिटमध्ये बोलत होते. यादरम्यान त्यांनी मान्य केले की, कोरोनानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर चर्चा झाली असून ICMR या प्रकरणी अभ्यास करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमच्याकडे लसीकरणाची आकडेवारी आहे. ICMR गेल्या 3-4 महिन्यांपासून अभ्यास करत आहे. सहा महिन्यांत अहवाल येणार होता. आता या अभ्यासाचा अहवाल येत्या दोन महिन्यांत येणे अपेक्षित आहे, असे मांडविया यांनी सांगितले.
हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीचाही एम्स दिल्लीकडून आढावा घेतला जात आहे. तसेच भारताच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच नव्हे तर निर्यातीसाठीही कोरोना लसीचे उत्पादन वाढविण्यात आले, असेही मांडविया यांनी नमूद केले.
केंद्रीय मंत्री म्हणाले, सुरुवातीला भारताला विनाशकारी परिणामांना सामोरे जावे लागेल, असे म्हणण्यात आले होते. पण सर्वोत्कृष्ट लस मोहीम आणि कोरोना व्यवस्थापनासाठी आज भारताचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. बिल गेट्स यांनीही भारताचे कौतुक केले आहे.
तरूणांमध्ये वाढत्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण
इंडियन हार्ट असोसिएशनच्या मते, गेल्या काही वर्षांमध्ये, 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 50% लोकांमध्ये आणि 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये 25% हृदयविकाराचा धोका दिसून आला आहे. म्हणजे तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत असून महिलांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा त्रास अधिक होत आहे. रक्तदाब, साखर, ताणतणाव, लठ्ठपणा, पुरेशी झोप न घेणे, आणि अनियमित जीवनशैली ही हृदयविकाराची प्रमुख कारणे मानली जातात.
अनेक तज्ञांचा असा अंदाज आहे की, कोविड संसर्गानंतर शरीरात रक्त गोठण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे आणि या वाढत्या हृदयविकारांमागे कोरोनाचा काही संबंध आहे का यासंदर्भातही अभ्यास सुरू आहे.