नवी दिल्ली – डोळ हा शरीराचा महत्वपूर्ण व संवेदनशील (eyes) अवयव असून त्याची योग्य रितीने काळजी घेणे गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार दृष्टीसंदर्भात समस्या निर्माण होऊ शकतात, मात्र पौष्टिक आहार व योग्य जीवनशैली राखल्यास डोळ्यांच्या समस्या (eye problems) रोखता येतात. वृद्ध व्यक्ती आणि मधुमेहग्रस्तांनी सामान्यपणे दरवर्षी एकदा तरी डोळ तपासून घेतले पाहिजेत. सुरूवातीच्या काळात डोळ्यांच्या समस्येची लक्षणे दिसल्यास त्यावर योग्य उपचार करता येणे शक्य होते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांची व्यवस्थित निगा (eye care) राखली पाहिजे.
अशी घ्या डोळ्यांची काळजी
धूम्रपान करू नका
धूम्रपानामुळे शरीरातील अनेक अवयवांचे गंभीर नुकसान होते. सिगारेटचा धूर हा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला हानी पोहोचवतो. आणि AMD किंवा इतर डोळ्यांच्या आजारांसाठी आणखी संवदनेशील बनवते, जे अन्यथा टाळता येऊ शकते. सिगारेटच्या धुरातील काही ऑक्सिडेंट्समुळे पेशींना त्रास होतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते आणि त्यामुळे हानिकारक जळजळ होते.
स्क्रीन कमी बघा
फोन आणि कॉम्प्युटरच्या अत्याधिक वापरामुळे आपले डोळे ब्ल्यू लाईटच्या संपर्कात येतात, ज्यामुळे डोळे कोरडे पडणे, थकवा येणे यापासून ते मायोपिया व एएमडी अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे स्क्रीन टाईम कमी करावा.
पोषक आहार घ्यावा
शरीराला रोजची कार्य नियमितपणे करता यावीत यासाठी पोषक तत्वांची गरज असून त्यासाठी निरोगी आहार घेणे महत्वाचे ठरते. फास्ट फूड आणि कँडीजचे सेवन करणे टाळावे. त्याऐवदजी अधिक भाज्या आणि फळे तसेच मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, संत्री, केल, गाजर यासारखे पदार्थ खाल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
डोळ्यांची नियमित तपासणी करावी
नेत्रतज्ज्ञांचा नियमित सल्ला घेतल्याने कोरडेपणा आणि लालसरपणा यासारख्या किरकोळ समस्यांवरही उपचार करता येतात. तसेच मोठ्या आजारांना सामोरे जाण्यातही मदत होते.
20-20-20 चा नियम
आपण दिवसभर स्क्रीन्स (मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप) पाहत राहतो, काम करतो. त्याने डोळ्यांवर ताण येतो. यासाठी एक सोपा व्यायाम करता येतो, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांवरील ताण कमी होऊ शकतो. 20 मिनिटे सतत स्क्रीन पाहिल्यानंतर थांबावे आणि सुमारे 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पहावे. हा व्यायाम दिवसभरात वारंवार आवर्जून करावा.