नवी दिल्ली – गेल्या दशकभरात बाहेरचे तळलेले अन्नपदार्थ म्हणजेच जंक फूड (junk food) खूप लोकप्रिय झाले आहे. एका अभ्यासानुसार तळलेले अन्नपदार्थ (fried food) हे हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण (diseases) देते. तुम्हाला जर तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारायचे असेल तर या 4 पदार्थांपासून दूर रहावे. या पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉल व फॅट्स वाढू शकतात.
तळलेले अन्नपदार्थ
अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की सॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवण्याचे काम करतात. तळलेले पदार्थ किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ यामध्ये मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते. या दोन्ही गोष्टींचा हृदयाच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. रेड मीट, फ्रेंच फ्राईज, सँडविच, बर्गर इत्यादी खाद्यपदार्थांमुळे एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
साखरयुक्त पदार्थ अथवा केक
साखरेला गोड विष असे म्हटले जाते. केक, मफिन्स, कुकीज आणि साखरयुक्त पेयांमुळे शरीरात जळजळ होते. साखरेच्या अतिसेवनाने शरीरातील चरबी वाढते, ज्यामुळे मधुमेह, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात या आजारांचा धोका वाढतो.
लाल मांस
मांसाहार करणाऱ्या लोकांमध्ये रेड मीट खूप लोकप्रिय आहे. मात्र त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण खूप असते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होऊ शकतो. ज्यांना लाल मांस खाण्याची आवड असते, त्यांनी ज्या भागामध्ये जास्त प्रोटीन्स आणि कमी फॅट असेल तो भाग खावा. जर तुम्ही चिकन खात असाल तर ब्रेस्ट, विंग्ज या भागात जास्त प्रोटीन्स आणि कमी फॅट असते. तर, मासे हा सर्वात आरोग्यदायी आणि उत्तम पर्याय आहे.
पांढरा तांदूळ, ब्रेड किंवा पास्ता
मैदा, साखर आणि प्रक्रिया केलेले तेल मिसळून व्हाईट ब्रेड तयार केला जातो, ज्याचा आपल्या आरोग्याला कोणताही फायदा होत नाही. पास्ताबाबतही असेच आहे. दुसरीकडे, पांढऱ्या तांदळाबद्दल सांगायचे तर, त्यात फायबरचे प्रमाण कमी असते, त्यामुळे त्याचे जास्त सेवन करणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले ठरत नाही. भातासोबत वरण, आमटी किंवा भाज्या खाल्ल्यास त्यातील पोषणाचे प्रमाण वाढते, परंतु तरीही भात खाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवावे.