मुंबई : हिवाळ्यात बहुतेक लोकांना सकाळी उठल्यानंतर अंगदुखीसारख्या वेदनांना सामोरे जावे लागते. हवामानातील अचानक बदलामुळे सुस्ती देखील येते. सांधेदुखीचा त्रास असलेल्यांना शारीरीक हालचालींच्या अभावामुळे सांधेदुखीची त्रास दिसून येतो. काहींना थंडीमुळे अस्वस्थता जाणवते जसे की डोकेदुखी. आपली हाडे, दात आणि सांधे यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावते. हिवाळ्यात त्याच्या कमतरतेमुळे, कॅल्शियम आणि फॉस्फरस योग्यरित्या शोषून घेण्यास शरीराची क्षमता कमी झाल्याने हाडांसंबंधी तक्रारी, फ्रॅक्चर्स, स्नायूंचा कमकुवतपणा दिसून येतो.
हिवाळ्यात पुरेसा सुर्यप्रकाश नसल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता भासते जी आपल्या हाडांसाठी दुष्परिणाम करते. जेव्हा हवेचे तापमान कमी होते तेव्हा बॅरोमेट्रिक दाब कमी झाल्यामुळे स्नायू आणि ऊतींचा विस्तार होऊन शारीरीक वेदनांसारखी लक्षणे आढळून येतात. यासंदर्भात आर्थ्रोस्कोपिक सर्जन आणि स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट डॉ. शरीफ दुडेकुला यांनी मार्गदर्शन केलं आहे.
थंडीच्या दिवसात उबदार कपडे घाला.
नियमित व्यायामाला महत्त्व द्या. यामुळे हाडे आणि स्नायू लवचिक राहण्यासाठी नक्कीच मदत होईल.
शरीरातील व्हिटॅमिन डी पातळी तपासून घ्या, व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स सांधेदुखी कमी करण्यात मदत करतात. रोजच्या जीवनात संतुलित आणि पोषक आहाराचा समावेश करा.
गरम पाण्याने अंघोळ करा, उबदार करडे वापरा (हातमोजे, लोकरीचे कपडे आणि पायात मोजे घाला), हीटिंग पॅडचा वापर करा. तुमच्या पाठीवरील तसेच गुडघे आणि नितंबांच्या सांध्यावरील ताण कमी करण्यासाठी संतुलित वजन ठेवा. गरम पेयाचे सेवन करा, पुरेशी झोप घ्या आणि संतुलित आहाराचे सेवन करा.