न्यूयॉर्क – प्रोटॉन पंप इनहिबिटर्स (PPIs)आणि हिस्टॅमाइन एच2-रिसेप्टर अँटागॉनिस्ट्स (H2-blockers) यासारखी पोटातील ॲसिडची (acid) निर्मिती कमी करणारी औषधे ही ॲसिड रिफ्लेक्सवर (acid reflex) उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. हे ॲसिड रिफ्लेक्स गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लेक्स आजार (GERD) म्हणूनही ओळखले जातात. मात्र हाडांच्या फ्रॅक्चरच्या (fracture) वाढीशी संबंध असलेल्या या औषधांचा मोठ्या व्यक्तींप्रमाणेच लहान मुलांवरही परिणाम होतो की नाही हे ठरवण्यासाठी पुरेसे संशोधन अद्याप झालेले नाही.
2001 ते 2013 या कालावधीदरम्यान मिलिटरी हेल्थकेअर सिस्टीम (MHS)मध्ये जन्मलेल्या आणि ज्यांची किमान दोन वर्ष काळजी घेण्यात आली अशा 8 लाख 74 हजार 447 मुलांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये असे आढळले की पहिल्या वर्षात जवळजवळ 10 टक्के मुलांना अँटासिड प्रिस्क्रिप्शन देण्यात आले. त्यामध्ये रॅनिटिडाइन (Zantac) आणि फॅमोटीडाइन (Pepcid), तसेच ओमेप्राझोल (Prilosec) आणि पॅन्टोप्राझोल सारख्या पीपीआय या एच 2-ब्लॉकर्सचा समावेश होता.
पीपीआयचा वापर करणाऱ्या मुलांमध्ये फ्रॅक्चरची शक्यता 22 टक्के वाढली होती, तर पीपीआय आणि एच 2-ब्लॉकर्स या दोन्हींचा वापर करणाऱ्या मुलांमध्ये फ्रॅक्चर होण्याची शक्यता 31 टक्के वाढल्याचे दिसून आले. एच 2-ब्लॉकर्सच्या वापराचा फ्रॅक्चरमध्ये तात्काळ वाढ होण्याशी संबंध नव्हता, असे अभ्यासात दिसून आले, परंतु कालांतराने फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढू शकते, असेही दिसून आले.
त्याशिवाय, ही औषधे जितके दिवस घेण्यात आली, तितक्या दिवसांत मुलांमध्ये हाडाच्या फ्रॅक्चरची संख्या वाढली होती. अँटासिड औषध वापरताना मुलांच वय जितकं कमी (लहान) फ्रॅक्चर होण्याचा धोका तितका जास्त असल्याचे दिसून आले. 6 महिन्यांपेक्षा कमी वयाचे असताना, ज्यांनी अँटासिड औषधे घेणे आधी सुरू केले होते, त्यांना फ्रॅक्चरचा धोका सर्वात जास्त होता. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत अँटासिड लिहून न दिलेल्या मुलांच्या तुलनेत ज्या मुलांनी वयाच्या दुसऱ्या वर्षानंतर अँटासिडचा वापर करण्यास सुरुवात केली, त्यांचा फ्रॅक्चरचा धोका वाढला नव्हता.
लहान मुलांमध्ये अँटासिड औषधांचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे, असे या अभ्यासाच्या प्रमुख लेखक असणाऱ्या लॉरा मॅलचोडी यांनी सांगितले.
प्रौढ व्यक्तींसाठी काउंटरवर अनेक अँटासिड्स सहज उपलब्ध असल्याने, ही औषधे सौम्य वाटू शकतात, असे डॉ. मॅलचोडी यांनी सांगितले. पण आमच्या अभ्यासाद्वारे मिळालेल्या पुराव्यांनुसार असे दिसते की अँटासिड औषधे मुलांसाठी, विशेषत: लहान मुलांसाठी सुरक्षित नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. तसेच
केवळ अधिक गंभीर लक्षणात्मक गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज (GERD)असलेल्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी हे औषध दिले पाहिजे, आणि तेही काही ठराविक कालावधीपुरतेच, असे त्या म्हणाल्या.