मुंबईः शाकाहारी (Vegetarian) असावं की नाही? काळाची, आरोग्याची (Health) नेमकी गरज काय आहे? आपली तत्त्व कुठवर पाळायची? तत्त्व पाळली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, यावरून पुन्हा एकदा मंथन सुरु आहे. कारण तशी एक बातमीच समोर आली आहे. तुम्ही शाकाहारी असाल तर इन्शुरन्स (Insurance) मिळण्यात काही अडचण येऊ शकते का, असा प्रश्न निर्माण झालाय. एका विमा कंपनीने नुकसान भरपाई नाकारण्यासाठी चक्क हे कारण सांगितलंय.
एका वृत्तानुसार, न्यू इंडिया इंश्योरन्स कंपनी लिमिटेडने असाच दावा केला होता. कंपनीच्या मते, शाकाहारी असल्यामुळे संबंधित व्यक्ती आजारी पडली. त्यामुळे त्यांचा मेडिक्लेम स्वीकारला जाणार नाही.
पण विमा कंपनीचं हे उत्तर ऐकून ग्राहक शांत बसला नाही. त्याने जिल्हा ग्राहक आयुक्तालयाकडे तक्रार केली.
मीत ठक्कर यांचा ऑक्टोबर 2015 मध्ये उपचार सुरु होता. त्यांना चक्कर येत असे. अशक्तपणा होता. शरीर जड जड होत होते. त्यांना Transient iscaemic attack (ITA) असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.
त्यांची होमीसिस्टीन लेव्हल 23.52 एवढी होती. साधारणतः ती 5 ते 15 दरम्यान असते. त्यांचं मेडिक्लेम बिलही एक लाख रुपयांपर्यंत झालं होतं.
पण न्यू इंडिया इंशुरन्स कंपनीने त्यांचे मेडिक्लेम नाकारले. कारण सांगितलं B12 ची उणीव असल्यामुळे ठक्कर यांना हा आजार झाला. ते शाकाहारी असल्याने त्यांच्या शरीरात या जीवनसत्त्वाची कमतरता भासली.
ठक्कर यांनी विमा कंपनीविरोधात अहमदाबाद जिल्ह्यातील कंझ्यूमर डिस्प्यूट रिड्रेसल कमीशन कडे तक्रार केली. सुनावणीनंतर कमीशन म्हणाले, शाकाहारी लोकांना B12 ची कमतरता भासू शकते. मात्र ठक्कर यांना त्यामुळेच हा आजार झाला, हे सांगता येत नाही.
याप्रकरणी डॉक्टरांचेही हेच मत पडले. शाकाहारी लोकांना B12 ची कमतरता भासू शकते. पण कंपनीने याची चुकीची व्याख्या करत मेडिक्लेम नाकारणे अयोग्य आहे.
कमीशनने विमा कंपनीला आदेश दिले. ठक्कर यांना एक लाख रुपयांची रक्कम व्याजासहित देण्यास करण्यास सांगितले. ऑक्टोबर 2016 पासून हे व्याज लागू असेल. तेव्हाच त्यांनी तक्रार दाखल केली होती. तसेच ठक्कर यांना हा खटला चालवण्यासाठी आलेला खर्च आणि मानसिक त्रासापोटी 5 हजार रुपये देण्याचेही आदेश कमिशनने दिले.