भारतामध्ये मधुमेह (diabetes) हा सामान्य आजार झाला आहे. देशात मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सुस्त जीवनशैली, अयोग्य खान-पान आणि काही चुकीच्या सवयी (bad lifestyle) यामुळे मधुमेहाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आकड्यांनुसार, देशात सुमारे 7.7 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त असून ही संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. टाइप 1 मधुमेह हा अनुवांशिक असतो, जो तुम्हाला तुमच्या कुटुंबियांकडून मिळू शकतो. मात्र टाइप 2 मधुमेह हा लोकांच्या चुकीच्या सवयी आणि अयोग्य खाण्या-पिण्यामुळे होतो, ज्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. कोणत्याही आजारापासून वाचायचे असेल तर सर्वप्रथम तो आजार होण्यामागची कारणे (causes) समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. मधुमेहाचा धोका कशामुळे (risk of diabetes) वाढतो याची कारणे आज जाणून घेऊया. जर तुम्हालाही मधुमेहापासून बचाव करायचा असेल तर ही कारणे नीट समजून घ्या व वेळीच त्यांच्यापासून दूर व्हा.
आराम करणं कोणाला आवडत नाही ? सर्वांनाच सोफा किंवा बेडवर झोपून वेबसीरिज किंवा चित्रपट पहायला आवडतं. मात्र बराच काळ असं सुरू राहिल्यास याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. बऱ्याच कालावधीसाठी बसून किंवा झोपून राहणे, कोणतीही शारीरिक हालचाल न करणे यामुळे हृदय, फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. ज्या व्यक्ती दिवसभर बसून किंवा झोपून राहतात, त्यांना टाइप -2 मधुमेह होण्याची शक्यता सर्वात जास्त असते, असे अभ्यासातून समोर आले आहे.
अधिक प्रमाणात कॅलरीजचे सेवन केल्याने वजन वाढे आणि टाइप 2 मधुमेह होण्याचा धोकाही वाढतो. एखादी व्यक्ती दिवसभरात जितके काम करते, तितक्याच कॅलरीजचे (त्यांनी) सेवन केले पाहिजे. जास्त शारीरिक हालचाल व कष्टाचे काम न करणाऱ्या व्यक्तींनी कमी कॅलरी असलेला आहार घ्यावा.
अनेक संशोधनातून ही माहिती समोर आली आहे की, व्यायाम केल्याने शरीराचे श्वसन तंत्र चांगले होते. मात्र तुमच्या कुटुंबात मधुमेह ग्रस्त व्यक्ती असतील तर व्यायामामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. आठवड्यात कमीत कमी 150 मिनिटे किंवा 5 दिवस व्यायाम केला पाहिजे.
अत्याधिक धूम्रपान आणि मद्यपान केल्याने हृदयरोग, हाय कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासारखे आजार होऊ शकतात. धूम्रपान केल्यामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि धमन्या अरुंद होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. तसेच मधुमेहही होऊ शकतो. अति प्रमाणात मद्यपान केल्यास फॅटी लिव्हरचा त्रास होतो, ज्यामुळेभविष्यात मधुमेह होऊ शकतो. त्यामुळे धूम्रपान व मद्यपान करू नये, त्यापासून लांब राहणे चांगले.
आवश्यक मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिअंट्सच्या कमतरतेमुळे अनेक आजार होऊ शकतात व आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्याशिवाय व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मधुमेहाचा धोका वाढतो. अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की हिरव्या पालेभाज्या, व्हेगन आणि मेडीटेरिअन डाएटमुळे मधुमेहाची सुरूवात रोखता येते. प्रोटीन, फायबर, गरज असलेले फॅट्स आणि कार्बोहायड्रेटने युक्त असा हेल्दी आहार घेतल्यास शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण आणि इन्सुलिनचा स्तर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
लिव्हर आणि शरीरांतर्गत जमा होणारे फॅट, याला व्हिसरल फॅट म्हटले जाते, ज्याचा इन्सुलिन रेझिस्टन्सशी संबंध असतो. त्यामुळे व्यक्तीचे वजन वाढू लागते, ज्यामुळे भविष्यात मधुमेहाचा धोका असतो. तर लोअर बॉडी इंडेक्स असणाऱ्यांना हा धोका कमी असतो.
तणावामुळे शरीर आणि मन या दोन्हींच्या मेकॅनिझममध्ये गडबड होते, ज्यामुळे लठ्ठपणा, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि मधुमेहाचा धोका वाढतो. अपुरी झोप होत असेल तर त्यामुळेही हा त्रास वाढू शकतो. त्यामुळे व्यायाम, मेडिटेशन आणि पौष्टिक आहाराचे सेवन करावे आणि त्याचसोबत तणावापासून दूर रहावे.