पीरियड्समध्ये डोळ्यातून रक्ताचे अश्रू, ऐकून चकित झालात? वाचा या दुर्मिळ आजाराचं भारतीय कनेक्शन

| Updated on: Mar 26, 2021 | 5:39 PM

तुम्ही चित्रपट किंवा मालिकेत 'खून के आंसू' म्हणजेच रक्ताचे अश्रू येतील अशी धमकी अनेकदा ऐकली असेल. मात्र, असं प्रत्यक्षात होत असेल यावर तुमचा विश्वास बसेल?

पीरियड्समध्ये डोळ्यातून रक्ताचे अश्रू, ऐकून चकित झालात? वाचा या दुर्मिळ आजाराचं भारतीय कनेक्शन
Follow us on

लंडन : तुम्ही चित्रपट किंवा मालिकेत ‘खून के आंसू’ म्हणजेच रक्ताचे अश्रू येतील अशी धमकी अनेकदा ऐकली असेल. मात्र, असं प्रत्यक्षात होत असेल यावर तुमचा विश्वास बसेल? तुम्हाला हे खरं वाटो अथवा नाही, पण हे असं झालंय आणि त्याचं भारतीय कनेक्शन देखील आहे. नुकताच ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये एक संशोधन अहवाल प्रकाशित झालाय. यात चंडीगडमधील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGI Chandigarh) संस्थेत 5 वर्षांपूर्वी असं एक प्रकरण समोर आल्याचं म्हटलं आहे. अशी दुर्मिळ लक्षणं दिसणारी ही जगातील दुसरी घटना आहे (Know all about bloody tears during periods and its treatment Ocular Vicarious Menstruation).

चंदीगडमधील या रुग्णालयात एका महिलेने आपल्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू येत असल्याची तक्रार केली. ही तक्रार ऐकून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. विशेष म्हणजे डोळ्यातून रक्त येण्याचा संबंध त्या महिलेच्या मासिकपाळीशी (पीरियड्स) होता. सामान्यपणे मासिकपाळी दरम्यान महिलांना पोटात दुखणे, हात-पाय दुखणे, पायाला गोळे चढणे, गॅस, ब्लोटिंग, भूक न लागणे, मळमळ किंवा उलट्या अशी लक्षणं दिसतात. मात्र, या महिला रुग्णाने सांगितलं की मासिकपाळीत आधी नाकातून रक्त यायचं, नंतर डोळ्यातून रक्ताचे अश्रू यायला लागले. याशिवाय या महिलेला इतर कोणताही त्रास होत नव्हता. विशेष म्हणजे असा त्रास तिच्या नातेवाईकांमध्येही कुणाला नव्हता.

मासिकपाळी संदर्भात दुर्मिळ आजाराचं निदान

डॉक्टरांनी या महिला रुग्णाची तक्रार ऐकल्यानंतर तिच्या अनेक तपासण्या केल्या. अनेक चाचण्या केल्या. मात्र, त्यात काहीही लक्षात आलं नाही. नंतर या लक्षणांवर अभ्यास करण्यात आला तेव्हा त्यात ही एक दुर्मिळ वैद्यकीय अवस्था असल्याचं लक्षात आलं. या आजाराला ऑक्यूलर विकेरियस मेंस्ट्रुएशन (Ocular Vicarious Menstruation) असं म्हणतात.

या दुर्मिळ आजाराची लक्षणं आणि उपाय काय?

हा दुर्मिळ आजार झाल्यास मासिकपाळीत गर्भाशयाशिवाय शरिराच्या इतर अवयवांमधूनही रक्त येतं. त्यामुळे अशा महिलांच्या नाकातून, डोळ्यांमधून, ओठांमधून अशा कोणत्याही अवयवातून रक्त निघू शकते. या आजाराशी संबंधित चाचण्या आणि उपचार सध्या तरी महागडे आहेत. चंदीगडमधील संबंधित महिलेवर 3 महिने हार्मोनल उपचार करण्यात आले. यानंतर ती ठणठणीत बरी झाली.

हेही वाचा :

Home Remedies | मासिक पाळी टाळण्याऱ्या औषधांचे आरोग्यावर गंभीर परिणाम, गोळ्यांऐवजी वापरा ‘हे’ घरगुती उपाय!

ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा

मासिक पाळीच्या त्रासापासून सुटका मिळण्यासाठी काही घरगुती उपाय

व्हिडीओ पाहा :

Know all about bloody tears during periods and its treatment Ocular Vicarious Menstruation