नवी दिल्ली : होळी हा रंगांचा सण अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा होळी (Holi) अधिक थाटामाटात साजरी होणार आहे. कोरोना काळाता कोणालाही होळीचा आनंद लुटता आला नव्हता, म्हणून यंदा होळी दणक्यात साजरी होताना दिसेल. होळी हा आपल्या देशातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे, त्यामुळे या निमित्ताने तो साजरा तर होईलच. रंगांच्या या सणात बाजारात विविध रंगांची (colors) विक्री होते. तथापि, रंग खरेदी करताना काही ते हर्बल (herbal colors) आहेत ना हे नीट पाहून मगच खरेदी करा, जेणेकरून तुमचे नुकसान (side effects) होणार नाही.
सामान्यत: बाजारात मिळणाऱ्या रंगांमध्ये रसायने असतात, ज्यामुळे त्वचेचे आणि केसांचे खूप नुकसान होते. पण तुम्हाला माहित आहे का की हे नुकसान फक्त केस आणि त्वचेपुरते मर्यादित नाही. हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, परंतु होळीचे हे रंग शरीराच्या अनेक भागांवर परिणाम करू शकतात.
होळीचा रंग हानिकारक कसा ?
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, होळीच्या निमित्ताने तुम्हाला पेस्ट, कोरडे रंग, ओले रंग असे अनेक पर्याय बाजारात मिळतात. पण बाजारातील बहुतांश रंगांमध्ये भरपूर रसायने असतात. पण ते रंग स्वस्त आणि मजबूत असतात, त्यामुळे बहुतेक लोक हे वापरतात. हे रंग केवळ तुमच्या त्वचेलाच नाही तर शरीराच्या अनेक भागांनाही हानी पोहोचवतात. याशिवाय मेटॅलिक पेस्टचाही भरपूर वापर केला जातो. चंदेरी, सोनेरी आणि काळ्या रंगाच्या मेटॅलिक पेस्ट्स भरपूर दिसतात. त्यामुळे डोळ्यांची ॲलर्जी, प्रकरण गंभीर झाल्यास अंधत्व येण्याचा धोका असतो. तसेच त्वचेवर जळजळ होणे, त्वचेचा कॅन्सर, काही वेळा किडनी निकामी होणे अशा समस्याही अनेकवेळा दिसून येतात. प्रत्येकजण हे रंग खरेदी करतो यात शंका नाही, परंतु त्यांचे हानिकारक परिणाम लक्षात घेऊन त्यांचा वापर टाळला पाहिजे, असे डॉक्टरांनी नमूद केले.
होळीचे रंग तुमच्या आरोग्याला कसे हानी पोहोचवतात ते जाणून घेऊया.
स्किन ॲलर्जीस ठरतात कारणीभूत : होळीच्या रासायनिक रंगांमुळे त्वचेवर ॲलर्जी होणे सामान्य आहे. याशिवाय पुरळ उठणे किंवा जळजळ होऊ शकते.
डोळ्यांना होते इन्फेक्शन : या रंगांमध्ये अनेक प्रकारची रसायने वापरली जातात. जर असे रंग डोळ्यात गेले तर त्यामुळे रेटिना खराब होऊ शकतो. त्याशिवाय डोळ्यांना संसर्गही होऊ शकतो. या रंगामुळे डोळ्यांमध्ये लालसरपणा येऊ शकतो, ज्यामुळे शेवटी डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा दाह होणे आणि अंधत्व येण्यासही कारणीभूत ठरू शकते.
कार्सिनोजेनिक : रंगांमध्ये असलेल्या रसायनांमुळे त्वचेचा कॅन्सर तसेच इतर कोणताही अंतर्गत कॅन्सर होऊ शकतो.
किडनीचे नुकसान : होळीच्या रंगात लीड ऑक्साईडही मिसळले जाते. यामुळे किडनी खराब होऊ शकते आणि किडनी निकामी होऊ शकते.
अस्थमा : होळीच्या रंगांमध्ये क्रोमिअम असते, जे फुफ्फुसांमध्ये आत शोषले जाऊ शकते आणि ब्रोन्कियल अस्थमासाठी कारणीभूत ठरू शकते. रंगामधील घातक रसायने फुफ्फुसात प्रवेश करतात आणि श्वसनमार्गास अवरोधित करतात.
हाडांवर परिणाम : जेव्हा लहान मुलं होळीचे रंग खेळतात, त्यामध्ये कॅडमिअमचे प्रमाण जास्त असते. जे हाडांच्या निर्मितीमध्ये व्यत्यय आणू शकतात आणि त्यामुळे हाडं कमकुवत होऊ शकतात.
न्युमोनिया : जेव्हा रंग श्वासोच्छवासाद्वारे तुमच्या फुफ्फुसात पोहोचतात तेव्हा फुफ्फुसाचा आजार होऊ शकतो. विशेषतः मुलांमध्ये हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.