नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्तीला कोणती ना कोणती अशी सवय असते, जी तो सोडू शकत नाही. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही अशा व्यसनाचा बळी असाल, तर स्वयंपाकघरातील हे साहित्य तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणारे आहेत. स्वयंपाकघरात प्रत्येक आजारावर औषध मिळू शकते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पोटदुखीपासून ते खोकला-सर्दीपर्यंत, प्रत्येक समस्येपासून मुक्ती मिळवण्याचे उपाय फक्त तुमच्या स्वयंपाकघरातच आहेत. त्यापैकीच एक म्हणजे लवंग (Clove). गरम मसाल्यांमध्ये समाविष्ट असलेली लवंग (Clove benefits) तुमचे व्यसन (addiction) दूर करू शकतात तसेच तर तुमची प्रतिकारशक्तीही मजबूत करतात
जाणून घ्या लवंग का आहे खास
व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेली लवंग शरीराची ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. स्वयंपाकघरात वापरला जाणारा हा मसाला आयुर्वेदिक औषधांमध्ये वनौषधी म्हणूनही वापरला जातो. यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळे शरीराची ताकद टिकून राहते. सकाळच्या चहापासून भाज्यांपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये लवंगाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
या संदर्भात तज्ज्ञ सांगतात की, आकाराने लहान दिसणार्या लवंगात जीवनसत्त्वे आणि खनिजांशिवाय अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. लवंग शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. याशिवाय लवंगात आढळणारे अँटिऑक्सिडंट हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचे काम करतात. त्यात युजेनॉल देखील आहे, जे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते.
एका दिवसात किती लवंग खाऊ शकतात
तुम्ही रोजच्या आहारात चहा, काढा किंवा पावडरच्या स्वरूपात दोन ते तीन लवंगा वापरू शकता. त्याचा प्रभाव गरम असतो. लवंगाचे जास्त सेवन केल्याने पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.
कशी करावी साठवणूक ?
जास्त काळ लवंग साठवण्यासाठी ती हवाबंद डब्यात बंद करून ठेवा. मात्र ती बरणी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या. तसेच तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद पॅकेटमध्ये लवंग पावडर ठेवू शकता. जेव्हा लवंग वारंवार हवेच्या संपर्कात येते तेव्हा तिचा सुगंध निघून जातो.
जाणून घ्या लवंगांचे फायदे
1) गोड पदार्थ व मद्यपानाचे क्रेव्हिंग करते कमी
लवंग योग्य प्रमाणात घेतल्यास अनेक समस्यांपासून आराम मिळतो. जर तुम्हाला गोड खाण्याची तल्लफ शांत करायची असेल, तर त्यासाठी एक लवंग तोंडात ठेवा आणि शक्यतोपर्यंत ती चोखत रहा. त्यामुळे गोड खाण्याची इच्छा हळूहळू कमी होऊ लागते. खरंतर लवंगांमध्ये निग्रीसिन आढळते. यामुळे शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलतेला फायदा होतो. याशिवाय सिगारेट ओढणे आणि मद्यपानाची समस्याही दूर होते.
2) ताप कमी होतो
जर तुम्हाला ताप येत असेल तर तुळशीच्या पानांसोबत लवंग पाण्यात घालून काही वेळ उकळा. त्यानंतर त्यात काही थेंब साखर किंवा मध मिसळून प्या.
3) श्वसनसंस्थेची घेते काळजी
रुमालात बांधलेल्या लवंगाचा वास घेतल्याने नाक बंद होण्याची समस्या कमी होते. एका ग्लास पाण्यात दोन लवंगा उकळून प्यायल्यास शरीरातील संसर्गाची समस्या टाळता येते. यासोबतच श्वास घेण्यास होणारा त्रासही टाळता येतो.
4) त्वचेच्या ॲलर्जीपासून मुक्त व्हा
जर तुमच्या त्वचेवर पुरळ उठत असेल आणि खाज येण्याची समस्या वाढत असेल तर लवंगा वापरणे फायदेशीर ठरते. त्यासाठी अंघोळ करण्यापूर्वी अंगावर लवंगाचे तेल लावून आंघोळ करावी. यामुळे त्वचेवर डाग आणि खाज येण्याची समस्या दूर होईल.
5) दाताच्या दुखण्यापासून मिळतो आराम
लवंगात आढळणारे अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी प्रभावी ठरतात. लवंग तेल आणि त्याची पेस्ट 70 टक्क्यांपर्यंत सूक्ष्मजीव कमी करू शकते. याशिवाय तुम्हाला दातदुखीचा त्रास होत असेल तर लवंग दातात दाबून ठेवा किंवा लवंगाचे तेल कापसाच्या बोळ्याला लावून दातांमध्ये दाबा. त्यामुळे सूज आणि दुखण्यापासून आराम मिळतो.