नवी दिल्ली – गरोदरपणा (pregnancy) हा प्रत्येक स्त्रीसाठी एक वेगळा अनुभव असतो. यामध्ये एका नव्या जीवाच्या येण्याचा आनंद तर असतोच पण त्याचसोबत खूप काळजीही घ्यावी लागते. गरोदरपणात काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत प्रत्येकाची स्वतःची मते आणि पद्धती आहेत. कारलं (bitter gourd) खाण्याबाबतही अशा अनेक शंका आणि प्रश्न आहेत. अनेकांना असं वाटतं की गरोदर असताना कारलं खाणं सुरक्षित नाही, तर काही लोक ते आरोग्यदायी मानतात. कारलं ही एक मध्यम आकाराची भाजी असून तिची चव कडू (bitter taste) असते. त्यामध्ये अनेक पोषक तत्वं आणि खनिजं असतात व ती खूप हेल्दी मानली जाते.
कारल खाण्याचे काही फायदे आणि तोटेही असतात, ते जाणून घेऊया.
कमी प्रमाणात करा सेवन
कारलं ही आरोग्यदायी भाजी आहे जी अनेक रोगांवर उपयुक्त आहे. कारल्याचे सेवन गर्भधारणेदरम्यान सुरक्षित असू शकते, पण ज्या महिलांना कोणत्याही प्रकारची ॲलर्जी किंवा संवेदनशीलता आहे त्यांनी कारल्याचे सेवन टाळावे. नॉर्मल प्रेग्नन्सीदरम्यान कारल्याचे कमी प्रमाणात सेवन करावे, मात्र त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
गरोदरपणात कारलं खाण्याचे फायदे
फोलेटचे प्रमाण जास्त – गरोदर स्त्रीसाठी फोलेट खूप महत्वाचे असते. यामुळे न्यूरल ट्यूबच्या संभाव्य दोषांपासून बाळाचे संरक्षण होण्यास मदत होते.
फायबरचे प्रमाण जास्त – या भाजीमध्ये भरपूर फायबर असते. ते खाल्ल्याने क्रेव्हिंग कमी होऊ शकते. कारल्याच्या सेवनाने गरोदरपणातही स्लिम राहण्यास मदत होते.
बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर – गर्भधारणेदरम्यान बऱ्याच स्त्रियांना बद्धकोष्ठता आणि मूळव्याधा त्रास जाणवतो. कारल्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
मधुमेह विरोधी – कारल्यामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. गरोदरपणात महिलांची साखरेची पातळी अनेकदा वाढते. कारल्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते.
गरोदरपणात कारल्यामुळे होणारे नुकसान
टॉक्सिसिटीचे कारण – कारल्यामध्ये रेजिन, क्विनाइन आणि ग्लायकोसाइड घटक असतात. हे असे काही पदार्थ आहेत जे शरीरात विषारीपणा वाढवू शकतात. यामुळे ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे आणि लाल पुरळ येणे, असा त्रास होऊ शकतो.
पोटासंबंधी समस्या – कारल्याचे अतिसेवन केल्यामुळे अतिसार, पोटदुखी आणि जुलाब यासारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
प्री-टर्म लेबर – कारल्यामुळे गर्भाशयाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. यामुळे प्री-टर्म लेबर किंवा मुदतपूर्व प्रसूतीची समस्या उद्भवू शकते.
कारल्याचे सेवन गरोदरपणात नियमित प्रमाणात केले जाऊ शकते, परंतु ज्या महिलांना याची ॲलर्जी आहे त्यांनी कारलं खाण्यापासून दूर राहावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)