रात्री ड्रायफ्रुट्स खाणं हेल्दी असते का ? कोणती वेळ आहे उत्तम ?

| Updated on: Jun 22, 2023 | 4:11 PM

ड्राय फ्रुट्स खाणे हे शरीरासाठी उत्तम असते. काही लोकांना ते सकाळी तर काहींना ते रात्री खाण्याची सवय असते. पण रात्रीच्या वेळेस ड्रायफ्रुट्स खाणे सुरक्षित असते का ? त्याने कोणता फायदा किंवा नुकसान होते ते जाणून घेऊया.

रात्री ड्रायफ्रुट्स खाणं हेल्दी असते का ? कोणती वेळ आहे उत्तम ?
Image Credit source: freepik
Follow us on

Right Time To Eat Dry Fruits : सुका मेवा किंवा ड्राय फ्रुट्स (Dry Fruits) हे अतिशय पोषक मानले जातात. त्यात सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. जर नियमितपणे पुरेसा प्रमाणात ड्राय फ्रुट्सचे सेवन केले तर त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती (strong immunity) मजबूत करण्यास देखील मदत होते. मात्र फक्त ड्राय फ्रुट्स सेवन करणे योग्य नसून ते खाण्याची योग्य पद्धत आणि वेळही सांभाळणे महत्वाचे ठरते.

उदाहरणार्थ, बदाम हे नेहमीच भिजवून आणि नंतर त्याची सालं काढून खावेत. किंवा अक्रोड, ते कितीही प्रमाणात नव्हे तर थोडेसेच खावेत. तरच त्याचा शरीराला योग्य फायदा मिळतो. नाहीतर तोटेही सहन करावे लागतात. त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य वेळही आरोग्यासाठी महत्वाची ठरते. रात्रीच्या वेळी सुका मेवा खाणे अनेक लोकांना आवडते. पण ते सुरक्षित आहे का ? त्याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया.

रात्री ड्रायफ्रुटस खावेत की नाही ?

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, रात्रीच्या वेळी ड्रायफ्रूट्स खाणे हे बिलकूल हेल्दी नसते. बदाम, अक्रोड यांसारखे ड्रायफ्रूट्स हे निसर्गत: उष्ण असतात, त्यामुळे रात्रीच्या वेळेस त्यांचे सेवन करणे हानिकारक ठरू शकते. तसेच ड्रायफ्रुटसमध्ये कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे रात्रीच्या वेळी ते खाल्ल्यास आपले वजनही वाढू शकते.

ड्रायफ्रुटस खाण्याची योग्य वेळ कोणती ?

ड्रायफ्रुटस ही रात्रभर पाण्यात भिजवून मग खाणे हे अधिक फायदेशीर मानले जाते. खरं सांगायचं तर ड्रायफ्रुटसचे सेवन अनेक प्रकारे करता येते. आपण ते नुसतेही खाऊ शकतो. तसेच स्मूदी किंवा शेक मध्ये घालूनही त्याचे सेवन करता येते. ड्रायफ्रुटसमध्ये हेल्दी फॅट्सचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे सकाळच्या वेळी ते खाणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अन्यथा नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये ड्रायफ्रुटस खाणे हे अतिशय आरोग्यदायी ठरते.

रात्री ड्रायफ्रुट्स खाण्याचे तोटे

शरीराचे तापमान

ड्रायफ्रुट्स हे उष्ण प्रभावाचे असतात, त्यामुळे रात्री जास्त ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हे शरीराचे तापमान वाढवू शकते आणि त्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटू शकते.

वजन वाढू शकते

ड्रायफ्रुट्समध्ये सर्व पोषक तत्वं तर असतातच पण त्यात कॅलरीही अधिक असतात. त्यामुळे रात्री ड्रायफ्रुट्स खाणे हे आपले वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. जे लोकं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी रात्री ड्रायफ्रुट्स खाणे जास्त हानिकारक ठरू शकते.

पोटाच्या समस्या

रात्रीच्या वेळी ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे पोटात उष्णता निर्माण होऊ शकते. त्यांच्या अती सेवनाने पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)